माजलगावात शेतकऱ्यांचा कापसाच्या मापासाठी चार तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:25 PM2020-02-28T18:25:09+5:302020-02-28T18:25:24+5:30
आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा
माजलगाव : येथे कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. यामुळे शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी रमेश आडसकर यांच्या पुढाकाराने यार्डमध्ये उभी असलेली कापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली तर आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात यावर्षी कापसाचे प्रचंड उत्पादन झाले असून त्यामुळे शेतकरी खुष आहे. मात्र आपला कापूस खरेदी केंद्रावर घालण्यासाठी शेतकरी दररोज खेटे मारत असून तालुक्यात अंबादास व मनकॉट जिनींग या दोन ठिकाणीच शासकीय खरेदी सुरू आहे. त्यामुळे तेथे शेतकऱ्यांनी कापूस घालून आणलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. परंतु या ठिकाणी ग्रेडर अनंत मोरेची मनमानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना चार-चार दिवसांपासून वाहनांचे भाडे भरत दिवसरात्र तिष्ठत राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला. शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
याची माहिती मिळताच भाजप नेते रमेश आडसकर यांनी तेथे जात शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. तात्काळ संबंधित अधिकारी व ग्रेडर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून इतर दोन खरेदी केंद्र सुरू करावयास भाग पाडले. तात्काळ पूर्वा जिनींग सुरू करण्यात आली. तर सोमवारी आणखी एक जिनींग सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली वाहने येथून हलवली. या ठिकाणी जवळपास चारशे वाहने कापूस तीन खरेदी केंद्रावर विभागून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी रामेश्वर टवानी,रामू चांडक,ईश्वर खुरपे,मनोज फरके उपस्थित होते.
ग्रेडरकडून अडवणूक
डीडीआर यांनी प्रत्येक जिनींगला वार ठरवून दिलेले आहेत. तरीही येथील ग्रेडर अनंत मोरे हे जागेचे कारण पुढे करून आमच्या जिनींगसाठी मापे घेण्यास टाळाटाळ करतात. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपला कापुस दूरवर घेऊन जाण्याची वेळ येत आहे.
- प्रविण चांडक , जिनींग मालक