बीडमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांना शेतक-यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:10 AM2017-11-20T01:10:01+5:302017-11-20T01:11:16+5:30
बीड : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर उडीद, मूग व सोयाबीनची १७ दिवसात केवळ २९९० क्विंटल खरेदी ...
बीड : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर उडीद, मूग व सोयाबीनची १७ दिवसात केवळ २९९० क्विंटल खरेदी झाली असून सरासरी दिवसाकाठी केवळ १७० क्विंटल इतकी कमी खरेदी झाली आहे. आॅनलाईन नोंदणी न केल्याने तसेच विविध कारणांमुळे शेतक-यांनी पाठ फिरविली असून शेतकरी केंद्रांवर का येईनात असा प्रश्न यंत्रणेलाही पडला आहे.
जिल्ह्यात हमीदराने खरेदीसाठी नाफेडच्या वतीने ३० आॅक्टोबरपासून अकरा केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर माल विकणा-या शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी आवश्यक आहे. या नोंदणीसाठी अर्ज दिल्यानंतर अॅपद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मात्र, अॅपची संख्या कमी असल्याने यात विलंब होत आहे. तर दुसरीकडे केंद्रावर माल विकण्यासाठी आर्द्रतेसह हेक्टरी मर्यादा निश्चित केली होती. शेतक-यांमधून ओरड सुरु झाल्यानंतर यात काही अंशी सुधारणा करण्यात आली. सरासरी कृषी पे-यानुसार हेक्टरी क्विंटल मर्यादा तसेच निश्चित केलेल्या उता-यानुसार विक्रीसाठी शिथीलता देण्यात आली. मात्र, नोंदणीअभावी अद्याप बहुतांश शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रापासून दूरच आहेत.
या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे जनरल मॅनेजर देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आॅनलाईन नोंदणीचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर किमान दहा मोबाईल अॅप नोंदणीसाठी उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी सिंग यांनी आदेश दिले.
बीड केंद्रावर ३०१.३३, पाटोदा येथे ६८.९८, कडा येथे १०.३० तर माजलगाव येथे ८३८.७१ अशी चार केंद्रांवर उडीदाची १२१९.३२ क्विंटल खरेदी झाली आहे.मुगाची बीड येथे ६९.२४, गेवराईत ७३.३०, धारुरमध्ये १८.२५, माजलगावात ८७०.९१ तर पाटोदा केंद्रावर ४१८ याप्रमाणे पाच केंद्रांवर १०३५.८८ क्विंटल खरेदी झाली आहे. बीड केंद्रावर ६७.९६, गेवराईत ७३.३०, माजलगावात ६६०.७३ अशी तीन केंद्रावर सोयाबीनची ७३४.५९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.