खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:15+5:302021-05-19T04:35:15+5:30
पाणी टंचाईचे सावट बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावात जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या ...
पाणी टंचाईचे सावट
बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावात जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात सर्वांना पाण्याची आस लागली आहे.
...
बँका पूर्णवेळ सुरू ठेवण्याची मागणी
बीड: जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोना लॉकडाऊन असल्याने बँकांचे व्यवहार पूर्ण क्षमतेने होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात अर्थकारण ठप्प झाले आहे. तरी बँका पूर्ण क्षमतेने चालू कराव्यात, यात कोरोना नियम पाळण्याचे सक्तीचे करावे, अशी मागणी आहे.
...
खते, बियाणे मोफत वाटप करा
बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांंनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे मोफत वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
....
काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके
बीड : पावसाळा पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकरी ही खरिपाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. यंदा बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तरी व्यापाऱ्यांनी योग्य किमतीत शेतकऱ्यांना बियाणे द्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी विभागाने दिला आहे.
...
कपाशी, सोयाबीन बियाणे बाजारात
धानोरा : आष्टी तालुक्यात खरीप हंगाम जवळ आल्याने कपाशी, सोयाबीनचे विविध कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी बाजारात आले आहे. कंपन्यांनी नवीन वाण विकसित केले आहेत. सर्वच कंपन्या आपलेच वाण कसे योग्य आहे, असा दावा करीत आहेत. यामुळे शेतकरीही यंदा कपाशीचे कोणते वाण लावायचे या द्विधा स्थितीत आहेत.
....
कडा येथील पुलाची दुरुस्ती करा
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहे. या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
....
पीक विमा रक्कम देण्याची मागणी
बीड : बीड जिल्ह्याचा २०२०-२०२१ या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. हा विमा मंजूर झाला आहे. परंतु अद्याप त्याचे वाटप विमा कंपन्यांनी केले नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी तातडीने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी होत आहे.
....
विद्युत पंपांची चोरी वाढली
बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.