महसूल बुडी रोखण्यासाठी स्वतंत्र पथकाचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:15+5:302021-03-20T04:32:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यातील वाळूचा अवैध उपसा, चोरटी वाहतूक व बुडीत महसूल रोखण्यासाठी महसूल विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील वाळूचा अवैध उपसा, चोरटी वाहतूक व बुडीत महसूल रोखण्यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र पथक बनवले असले, तरी आजवर या पथकाने एकही कारवाई केलेली नाही. उलट महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्री, अपरात्री वाळूची बेसुमार तस्करी सुरूच आहे. तालुक्यात एकही असे गाव नाही, तिथे जागोजागी वाळू टाकलेली दिसत नाही. टिप्परचालक दामदुप्पट पैसे घेऊन रात्र जागून काढत आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवला जात असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आष्टी तालुक्यातील सिनाच्या पात्रातून टाकळसिंग व घोंगडेवाडी आणि नदीचे पाणी काही ठिकाणी तळाला गेल्याने तेथून मशीनच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. महसूल व पोलीस पथकांची माहिती मिळवण्यासाठी टीप दिली जात असल्याने वाळू माफियांना कोणत्या परिसरातून वाळू उपसा करायचा, हे लक्षात येते. तर दुसरीकडे महसूल विभागाचे पथक दिवसभर कुठे घिरट्या घालते हे कळत नाही, फक्त नावालाच पथक असल्याने या पथकाने आजवर एकही कारवाई केलेली नाही. उलट वाळू माफियांबरोबर आर्थिक हितसंबंध ठेवत रात्री, अपरात्री बिनधास्त वाळू उपसा करण्याची अप्रत्यक्ष मुभा दिली जाते की काय? असे चित्र आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी तालुक्यातील वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी मंडल अधिकारी, नायब तहसीलदारांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.