माजी सैनिकाचे कुटुंबासह दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:59+5:302021-02-27T04:45:59+5:30
तालुक्यातील दिंद्रुड येथील तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास शासकीय जमिनीवरील प्लॉट विकला. यासाठी ...
तालुक्यातील दिंद्रुड येथील तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास शासकीय जमिनीवरील प्लॉट विकला. यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर एक महिन्यापूर्वी उपोषण केले होते. सदरील एक महिन्यात जागेची मोजणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले होते. परंतु, यात कोणावरच काहीच कारवाई करण्यात आली नसल्याने माजी सैनिकाने आपल्या कुटुंबासह दुसऱ्या दिवशीही पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू ठेवले आहे.
पाच वर्षांपूर्वी ग्रामसेवक राजकुमार झगडे, उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गट नंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस नसणारा शासकीय प्लॉट विक्री केला. यावेळी बनावट दस्तावेज तयार करून जागेचा बांधकाम परवाना गणपत ठोंबरे यांच्या नावे असल्याचा देखावा केला.
कालांतराने शासकीय कामासाठी प्लॉटचे ओरिजनल कागदपत्रे लागत असल्याने सुरेश मुंडे यांनी पीटीआर काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे गेले असता हा प्लॉट शासकीय असल्याची बाब उघड झाली. कुठेच दाद मिळत नसल्याने शेवटी माजी सैनिक यांनी आपल्या दिव्यांग मुलांसह कुटुंबासह दुसऱ्या दिवशीही पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण चालूच आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
गटविकास अधिकारी नाॅट रिचेबल
माजी सैनिकाचे दुसऱ्या दिवशीही आपल्या अपंग मुलगा व कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे. याबाबत गटविकास अधिकारी प्रज्ञा माने भोसले यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी अनेक वेळा फोन केला असता त्यांचा मोबाईल नाॅट रिचेबल होता. राजकीय दबावापोटी त्यांनादेखील यात काही निर्णय घेता येत नाही, असे पंचायत समितीचे कर्मचारी दबक्या आवाजात बोलताना दिसत होते.