श्रावणात उपवास महागला; भगर, साबुदाणा, शेंगदाणा १५ रुपये किलोने वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:43 PM2019-08-04T23:43:59+5:302019-08-04T23:45:07+5:30
श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
बीड : श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतू यंदा श्रावणाचे उपवास महागल्याचे किराणा बाजाराचा कानोसा घेतल्यानंतर दिसून आले.
दिवाळीपासून किराणा बाजारात फारशी तेजीमंदी झाली नसलीतरी हळूवारपणे काही वस्तू धान्य महागले आहेत. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. मात्र यंदा साबुदाणा, शेंगदाणा, भगर, राजगिऱ्याच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयांची तेजी झाली आहे.
किराणा किरकोळ बाजारात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ७० रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे १५ रुपये वाढ झाली आहे. श्रावणात येथील बाजारात १५० टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. तर शेंगदाण्याचे दर ८० रुपये होते. सध्या ९० रुपये किलो भाव आहेत. या महिन्यात जवळपास २०० टन शेंगदाण्याची विक्री होते. तर ७५ रुपये किलो असणारी भगर किलोमागे १५ रुपयांनी वधारली आहे. भगरीचे दर ९० रुपये किलो आहेत. श्रावणात ८ ते १० टन भगरीची आवक होते. राजगिºयातही ५ रुपये किलोने वाढ झाली आहे. ७५ ते ८० रुपये किलो दर आहेत. राजगिºयाचे आयते खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध असल्याने सामान्य ग्राहकांकडून मागणी कमी असते. त्यामुळे बाजारात ८ ते १० क्विंटलपेक्षा जास्त आवक होत नाही. पेंडखजूरही २०० रुपये किलोपर्यंत बाजारात उपलब्ध असून २ टन आवक झाली आहे. गुळाची ५० टन आवक झाली असून दरात मागील महिन्याच्या तुलनेत ५ रुपये किलोने वाढ झाली आहे.