दहिफळ वडमाऊलीकरांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:53 PM2020-02-07T23:53:45+5:302020-02-07T23:54:12+5:30
तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणुका देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम चोरीच्या घटनेला तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही पोलीस प्रशासनाला आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही.
केज : तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणुका देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम चोरीच्या घटनेला तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही पोलीस प्रशासनाला आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. या प्रकरणातील फरार मारेकऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी ग्रामस्थांसह ७ फेब्रुवारीपासून गावातच उपोषणाला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणूका देवीचे देवस्थानचे पुजारी रामलिंग माधव ठोंबरे यांचा अज्ञात व्यक्तींनी २ नोव्हेंबर २०१९ रोजी निघृणपणे खून करून मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांना अद्याप पुजाºयाचा खून करणारे मारेकरी कोण होते? याचा अद्यापही तपास लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास तत्काळ करावा, अशी मागणी ठोंबरे व ग्रामस्थांनी पोलीस अधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
सीआयडीकडे तपास देण्याची मागणी
या प्रकरणाचा तपास केज पोलिसांनी एक महिना चांगल्या प्रकारे केला. मात्र नंतर त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणातील आरोपी आजही मोकाट आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी (क्राईम) कडे देण्याची मागणी ठोंबरे यांनी केली आहे. दरम्यान या खून प्रकरणाचा परिणाम भाविकांवर झाला आहे. त्यामुळे आरोपीचा शोध तात्काळ लागणे गरजेचे असल्याचे मत पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.