श्रावणातला उपवास महागला; शेंगदाणे दहा, तर साबुदाण्यात किलोमागे पाच रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:27+5:302021-08-25T04:38:27+5:30
बीड : श्रावणात सोमवारसह महिनाभर उपवास केले जातात. त्यामुळे उपवासाला लागणाऱ्या पदार्थांची मागणी वाढली असून, शेंगदाणे, साबुदाण्याच्या दरात किलोमागे ...
बीड : श्रावणात सोमवारसह महिनाभर उपवास केले जातात. त्यामुळे उपवासाला लागणाऱ्या पदार्थांची मागणी वाढली असून, शेंगदाणे, साबुदाण्याच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. उपवासात एनर्जी देणारे पदार्थ चवीला आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. श्रावणातील उपवासामुळे किरकोळ किराणा दुकानांमध्ये भगर, शेंगदाणे आणि साबुदाण्याची मागणी काही प्रमाणात वाढली आहे, तर पुरवठा कमी असल्याने दरही वाढले आहेत. बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री व अन्य गावांत शेतकरी भुईमुगाचे पीक घेतात. त्यामुळे बाजारात शेंगदाण्याची मागणी कमी आहे. घुंगरू शेंगदाण्याचे भाव कमी असून, गावरानचे दर काहीसे वधारले असल्याचे व्यापारी नीलेश लोढा यांनी सांगितले.
असे वाढले दर
श्रावणाआधी आता
साबुदाणा ५५ ६०
शेंगदाणे १०० ११५
भगरीचे दरही वाढले
नाशिक जिल्हा व घोटी परिसरात यंदा पीक कमी असल्याने भगरीचे उत्पादन कमी झाले आहे. साबुदाण्याऐवजी भगर व इतर पदार्थ आहारात वापरले जात आहेत. जुलैपर्यंत स्थिर भाव असणाऱ्या भगरीच्या दरात किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे.
आवक घटली, मागणी वाढली
साबुदाणा-तामिळनाडूच्या सेलम भागातही साबुकंद पीक कमी आहे. महाशिवरात्रीपासून साबुदाण्याचे भाव स्थिरच होते. नंतर वाहतूक दरात वाढ झाली, तर श्रावणात मागणी वाढल्याने किलोमागे ५ रुपयांची वाढ झाली.
शेंगदाणा-बीड जिल्ह्यात गुजरात आणि कर्नाटकमधून शेंगदाण्याची आवक होते. चांगल्या प्रतीच्या शेंगदाण्याला मागणी असते. मागील काही महिन्यांत कमी आवक, तसेच वाहतूक दरामुळे शेंगदाण्याचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत.
----------
श्रावण असूनही भगर, साबुदाणा, शेंगदाण्याला फारसा उठाव नाही. अनलॉक असले तरी मंदिरे बंद आहेत. सप्ताह, जत्रांना प्रतिबंध आहे. महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन नाही, त्यामुळे मागणी वाढलेली दिसत नाही.
- माऊली वाघमारे, किराणा व्यापारी, बीड
------------