परळीत ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; सीमेंटच्या अवजड पोलखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:57 AM2024-04-17T11:57:39+5:302024-04-17T12:41:38+5:30
विद्युतवाहिनीसाठीचे सिमेंटचे पोल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा उतारावर अपघात
परळी: विद्युतवाहिनीसाठीचे सिमेंटपोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर धर्मापुरी रस्त्यावर मंगळवारी रात्री उलटले. या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टरमधील सिमेंटपोल अंगावर पडल्याने त्याखाली दबून भोजनकवाडी येथील दोन कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी रात्री धर्मापुरी येथून पाच मजूर एका ट्रॅक्टरमधून विद्युतवाहिनीसाठीचे सिमेंटचे पोल घेऊन भोजनकवाडीकडे जात होते. धर्मापुरी रस्त्यावरील कॉलेजजवळील उतारावर अचानक ट्रॅक्टर उलटला. काही कळायच्या आत ट्रॅक्टरमधील मजूरांच्या अंगावर सीमेंटचे पोल पडले. अवजड पोल खाली दबल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. प्रल्हाद वैजनाथ फड व भाऊसाहेब माणिक केदार ( दोघे राहणार भोजनकवाडी ) असे मृत्यू पावलेल्या कामगारांची नावे आहेत.
दरम्यान, माहिती मिळताच परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील , एपीआय जाधव,नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार यांनी अपघातस्थळी भेट देऊन मदत कार्य केले. तिन्ही जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे समजते. दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने भोजनवाडीमध्ये शोककळा पसरली आहे.