कुऱ्हाडीने हल्ला करून पित्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:39 AM2021-08-25T04:39:02+5:302021-08-25T04:39:02+5:30

बीड : पीककर्ज काढण्यावरून पिता-पुत्रात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात मुलगा व वडील दोघेही जखमी झाले. मात्र, बेशुद्धावस्थेत ...

Father murdered by attack with an ax | कुऱ्हाडीने हल्ला करून पित्याचा खून

कुऱ्हाडीने हल्ला करून पित्याचा खून

Next

बीड : पीककर्ज काढण्यावरून पिता-पुत्रात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात मुलगा व वडील दोघेही जखमी झाले. मात्र, बेशुद्धावस्थेत वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे २३ ऑगस्ट रोजी घडली. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी पित्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा कांगावा करत सकाळी अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पोलिसांनी दोन मुलांसह तीन भाऊ अशा पाच जणांना अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, महादेव बलभीम औटे (६०,रा. पारनेर) असे मयताचे नाव आहे. औटे कुटुंबाला १२ एकर शेती आहे. महादेव यांना पीककर्ज उचलायचे होते, पण ते फेडायचे कोणी यामुळे मुलगा योगेश याचा त्यास विरोध होता. महादेव औटे हे मात्र पीककर्ज काढण्यावरून ठाम होते. दरम्यान, याच कारणावरून २४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता त्यांच्यात घरी शाब्दिक वाद झाला. यावेळी घरातील इतर लोक शेतात होते. वाद वाढत गेला. दोघेही एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावले. ते दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर मुलगा योगेश याने जन्मदात्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. प्रत्युत्तरादाखल महादेव यांनीही योगेशवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात योगेशच्या पाठीत व डाव्या हाताच्या दोन बोटांबर खोल जखम झाली. यानंतर वडील महादेव हे आपल्या खोलीत गेले. दरवाजा बंद करून ते झोपी गेले. इकडे योगेशने बीडमध्ये खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. सायंकाळी घरातील इतर मंडळी शेतातून परतली; पण त्यांनी नित्याप्रमाणे बलभीम हे झोपले असावेत म्हणून दुर्लक्ष केले.

रात्री ११ वाजता योगेश घरी परतला तेव्हा पिता-पुत्रात वाद झाला होता ही बाब समोर आली. त्यांनी महादेव यांना आवाज दिला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. फटीत हात घालून कडी उघडून पाहिले तेव्हा ते मयत आढळले. हवालदार आदिनाथ तांदळे यांच्या फिर्यादीवरून मुलगा योगेश महादेव औटे, गणेश महादेव औटे, भाऊ वाल्मीक बलभीम औटे, परमेश्वर बलभीम औटे, विष्णू बलभीम औटे यांच्यावर खून, पुरावा नष्ट केल्याच्या कलमाखाली पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक मणेश पाटील यांनी भेट दिली.

__

अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांना कुणकुण

दरम्यान, रात्री ही बाब औटे कुटुंबीयांनी कोणालाही कळू दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बोभाटा करून अंत्यसंस्कार उरकले. मात्र, येथेच महादेव औटे यांचा मृत्यू नैसर्गिक नसून मुलाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात ते गतप्राण झाल्याची चर्चा सुरू झाली आणि याची कुणकुण बीट अंमलदार आदिनाथ तांदळे यांना लागली.

__

हाताच्या जखमेने घटनेचा उलगडा

पोलीस निरीक्षक मनेश पाटील, हवालदार आदिनाथ तांदळे यांनी पारनेर गाठले. औटे कुटुंबीयाने सुरुवातीला आढेवेढे घेतले; पण योगेशच्या हाताला जखम कशाची, या प्रश्नाचे उत्तर देताना तो गडबडला. अखेर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा करत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पाचही जणांना अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनेश पाटील यांनी दिली.

Web Title: Father murdered by attack with an ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.