शेतात काम करताना विजेचा धक्का बसून बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:05 PM2024-10-24T18:05:35+5:302024-10-24T18:06:20+5:30

एकाच चितेवर पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

father-son died due to electric shock while working in the field; Cremation on a single pyre | शेतात काम करताना विजेचा धक्का बसून बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

शेतात काम करताना विजेचा धक्का बसून बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

आष्टी : तालुक्यातील टाकळसिंग येथे शेतात काम करताना विजेचा शॉक लागून शेतकरी पिता- पुत्रांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरा एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब विनायक कुमकर (वय ५५) बिभीषण दादासाहेब कुमकर (वय ३२) अशी मयत पिता-पुत्रांची नावे आहेत.

टाकळसिंग येथील शेतकरी दादासाहेब कुमकर व बिभीषण कुमकर हे आपल्या शेतात नव्याने डाळिंब बागाची लागवड करण्यासाठी काम करत होते. यावेळी शेतातील विद्युतपुरवठा होणाऱ्या खांबांवरील तारेवर करंट उतरला होता. या ताणेला स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती कळताच नातेवाईक, शेजारील नागरिकांनी शिवारात धाव घेतली. बिभीषण यास उपचारासाठी जामखेड येथे घेऊन जाताना वाटेतच प्राणज्योत मालवली. तर त्याचे वडील दादासाहेब यांना आष्टी येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, पोह. अशोक शिंदे, पोना. प्रवीण क्षीरसागर, पोशि. मजर सय्यद, पोशि. राजाभाऊ सदगुणे यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री टाकळसिंग येथे एकाच चितेवर पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी तर बिभीषण कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

पाऊस झाल्यानंतर पोलजवळ जाऊ नये
पावसाळ्यात विद्युत ताराला चिटकण्याच्या घटना घडत असतात. नागरिकांनी व विशेषतः शेतकरीबांधवांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. शेतात काम करत असताना पाऊस झाल्यानंतर विजेच्या पोलजवळ जाऊ नये, असे आवाहन महावितरण कंपनीचे उपअभियंता शिवाजी देशमुख यांनी केले आहे.

Web Title: father-son died due to electric shock while working in the field; Cremation on a single pyre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.