लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 12:34 PM2022-03-05T12:34:38+5:302022-03-05T12:48:09+5:30
औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करत अर्धांगवायू झालेल्या पित्यास वेळेवर उपचार मिळाल्याने वाचले प्राण
- रवींद्र अमृतकर
नागद ( औरंगाबाद ) : शेतकरी असलेल्या पित्याला अचानक अर्धांगवायूचा झटका आला. मात्र धाडसी आरतीने घाबरुन न जाता मोटरसायकलवर पित्याला मध्ये बसवून आईला पाठिमागून घट्ट पकडायला लावले. औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करीत १०० कि.मी. अंतरावर असलेल्या औरंगाबादमधील रुग्णालयात वेळेवर पोहोचविले. यामुळे वडिलांचे प्राण वाचले असून आरतीच्या या धाडसाचे गावासह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नागदपासून जवळ असलेल्या जामडी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी असलेले संजय परदेशी यांना दोन मुली असून मुलगा नाही. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. यामुळे घरात आता संजय परदेशी त्यांची पत्नी व मुलगी आरती हे तिघेच राहतात. आरती ही राष्ट्रीय उच्च माध्य. विद्यालयात बारावीत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी संजय परदेशी यांना अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे त्यांची पत्नी व आरती हे काळजीत पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असल्याने तसेच वाहनाची व्यवस्था नसल्याने आरतीने मोटरसायकलवर वडिलांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तातडीने वडिलांना मोटारसायकलवर मध्ये बसवून पाठिमागे आईला त्यांना घट्ट धरुन बसण्यास सांगितले. आणि औरंगाबादकडे प्रवास सुरु केला.
जामडीपासून औरंगाबादचे अंतर हे शंभर कि.मी. असल्याने आजारी वडिलांसह ट्रिपल सीट प्रवास सोपा नव्हता, त्यात रस्तेही खराब मात्र आरतीने हिंमत न हारता औरंगाबाद गाठले. येथील एका खाजगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने वडिलांचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरतीने दाखविलेल्या या धाडसाबद्दल तिचे गावातून कौतुक केले जात आहे. यानिमित्त राष्ट्रीय विद्यालयात आरतीचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अर्जुन नितीन पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बी.एस. साळवे, बी.टी. जगताप, पी.एन. पवार, शेखर पाटील, प्रशांत पाटील, चव्हाण, गायकवाड, दीप्ती पाटील आदींची उपस्थिती होती.
रस्त्यात आठ कि.मी.चा औट्रम घाट
आरती व तिच्या आईने आजारी वडिलांना मोटारसायकलवर बसवून प्रवास सुरू केला. तेव्हा वाटेतच संजय परदेशी यांची प्रकृती आणखी खराब झाली. तेव्हा आरतीने आईला त्यांना घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. त्यातच वाटेत अत्यंत खडतर व आठ कि.मी. अंतर असलेला नागद घाटातील ट्रिपल सीट प्रवास अत्यंत धोकादायक होता. तरीही न डगमगता आरतीने वडिलांना सुखरुप रुग्णालयात पोहोचविले.