नात्याला काळीमा; पोटच्या मुलींवर पित्याचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:35 PM2020-04-03T19:35:43+5:302020-04-03T20:32:29+5:30
2012 पासून दोन मुलींवर अत्याचार
केज : तालुक्यातील एका महाविद्यालयात पेशाने मुख्याध्यापक असलेल्या पित्याने स्वत:च्या पोटच्या दोन मुलींवर वेळोवेळी अत्याचार केला. हा त्रास सहन होत नसल्यामुळे शिक्षणासाठी बाहेर असलेल्या एका पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मावशीच्या मोबाईलवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती दिली. त्यानुसार त्यांनी महिला अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या एका संस्थेला ही माहिती दिली. त्यानंतर मुलींच्या फिर्यादीवरून नराधम पित्यासह आई वडील व इतर पाच जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या पित्याने पोटच्या मुलीवर ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना २०१२ सालापासून बळजबरी करून अत्याचार केले. याची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला दिली असता, तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर वडिलांनी वेळोवेळी अत्याचार केले. तर दुसरी मुलगी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिच्यावर देखील अत्याचार केला. या बाबतची माहिती दुसऱ्या पीडित मुलीने देखील तिच्या आईस दिली मात्र, त्यावेळी तिला देखील बेदम मारहाण केली. पीडित मुलींनी मारहाण व समाजाच्या भितीपोटी अत्याचार अनेक वर्ष सहन केला.
अखेर एका मुलीने याची माहिती तिच्या मैत्रिणीच्या मावशीला संपर्क साधून दिली. त्यांनी कोल्हापूर येथील ह्युमन राईट असोशियशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेचे कोल्हापूर जिल्हा सचिव हमीद पन्हाळखर यांना दिली. ही सर्व माहिती त्यांनी केज पोलीस निरिक्षक प्रदीप त्रिभुवन यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पीडित मुलींची घरी जाऊन भेट दिली व संरक्षण दिले. त्यांना धीर दिला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात नराधम पित्यासह त्याला मदत करणारी पीडित मुलीची आई, भाऊ, चुलता व चुलत भावांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाचे मानले आभार
जेव्हा मैत्रिणीच्या मावशीला हा प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांकडून प्रतिसाद मिळेल का नाही याविषयी शंका होती. मात्र, पोलिसांनी केलेली कारवाई व दिलेल्या प्रतिसादामुळे आमची सुटका झाली असल्याचे पीडितेने सांगितले.
बापासह चौघांना पोलीस कोठडी
पोटच्या तीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तो नराधम बाप, आई, चुलता व चुलत भाऊ यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधार गृहात केली आहे. आज केज न्यायालया समोर उभे केले असता पीडित मुलींचा नराधम बाप, आई, चुलता व चुलत भाऊ या चौघांना दि.७ एप्रिल २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पीडितेचा भाऊ हा अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी दिली