बापाचे दात पाडले, लेकाचा पाय तोडला; भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेसह सात जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:13 IST2025-03-07T16:56:56+5:302025-03-07T17:13:05+5:30

जखमी शेतकरी हातात सलाइन घेऊन एसपी ऑफिसमध्ये गेला

Father's teeth knocked out, son's leg broken; BJP worker Satish Bhosale and seven others booked | बापाचे दात पाडले, लेकाचा पाय तोडला; भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेसह सात जणांवर गुन्हा

बापाचे दात पाडले, लेकाचा पाय तोडला; भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेसह सात जणांवर गुन्हा

बीड : हरण पकडण्याच्या कारणावरून तोंडावर कुऱ्हाड मारली, यात वृद्धाचे समोरील १० दात पडले, तसेच सत्तूर मारून मुलाचा पाय तोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील बावी येथे घडली होती. याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पीडितांनी शिरूर ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेसह सात जणांवर गुरुवारी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

भाऊसाहेब निराळ्या भोसले, साईनाथ भोसले, सतीश भोसले, हरक्या निराळ्या भोसले, निराळ्या भोसले व अन्य दोघे (सर्व रा. झापेवाडी फाटा, ता. शिरूर), अशी आरोपींची नावे आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दिलीप रामराव ढाकणे व त्यांचा मुलगा महेश दिलीप ढाकणे (रा. राणवस्ती, बावी, ता. शिरूर) हे सकाळी शेतात गेले. त्यांना आपल्या शेतामध्ये हरण पकडण्याचे जाळे लावल्याचे दिसले. यावर दिलीप ढाकणे यांनी आमच्या शेतात जाळे लावून हरणे पकडू नका, असे भाऊसाहेब भोसले याला सांगितले. याचा राग मनात धरून हे सर्व लोक त्यांच्या अंगावर धावून आले. यातील सतीश भोसले याने कुऱ्हाडीने तोंडावर मारून दिलीप यांचे समोरील १० दात पाडले, तसेच आमच्या शिकारीस नेहमीच आडवे येतात, तुमचा मुडदाच पाडतो, असे म्हणत दिलीप यांचा मुलगा महेश याच्या पायावर सत्तूर मारून तोडण्याचा प्रयत्न केला. इतरांनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. ६ मार्च रोजी शिरूर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला.

सतीश भोसलेची दहशत
सतीश भोसले हा भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याची तालुक्यात दहशत आहे. त्यामुळेच ढाकणे बाप-लेक एवढ्या दिवस तक्रार देण्यासाठी पुढे आले नव्हते; परंतु बुधवारी अर्धनग्न करून तरुणाला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ढाकणे यांच्या नातेवाइकांनी आधार देत पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे गुन्हा दाखल झाला.

हातात सलाइन घेऊन एसपी ऑफिसमध्ये
दिलीप ढाकणे हे घटनेच्या दिवशी प्राथमिक उपचार घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या तोंडातून रक्त पडत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर नातेवाइकांनी ढाकणे यांची भेट घेत तक्रार देण्यास सांगितले.

Web Title: Father's teeth knocked out, son's leg broken; BJP worker Satish Bhosale and seven others booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.