बीडमध्ये उडीद खरेदी बंदने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:23 AM2017-12-14T00:23:46+5:302017-12-14T00:25:02+5:30
नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला. त्यामुळे खरेदी थांबवावी लागली. परिणामी उडीद विकण्यासाठी केंद्रावर आलेल्या शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्गावर जिरेवाडी - मिनी बायपास येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकरी शांत झाले.
बीड, आष्टी, कडा आणि पाटोदा येथे हमीभावाने उडीद खरेदीसाठी नाफेडचे केंद्र होते. ते सुरु झाले तेव्हाच १३ डिसेंबर रोजी खरेदी बंद करण्याचे निर्देश नाफेडच्या वतीने दिले होते. दरम्यान, आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांना एसएमएस मिळाल्यानंतर उडीद विकता आला. १० तारखेला जारी केलेले एसएमएस मिळाल्यानंतर मागील दोन दिवसात शेतकºयांनी खरेदी केंद्रावर मोठी गर्दी केली.
बुधवारी खरेदी सुरु होती. मात्र, गर्दीमुळे गोंधळ झाला. परिणामी खरेदी थांबवावी लागली. उडीद विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी यावेळी व्यापा-यांचे राजरोस माप घेतले जात असल्याचा आरोप केला. उप अधीक्षक खिरडकर यांनी समजूत काढत बाजार समितीच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. मध्यस्थीनंतर शेतक-यांची वाहने जवळच्या परिसरात लावण्यात आली.
दिलेल्या तारखेनुसार न येता एकाच दिवशी गर्दी झाली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माप घेण्यात आले. बुधवारच्या गोंधळामुळे पोलीस संरक्षण मागितले असून, आॅनलाईन नोंदणी झालेल्या शेतक-यांच्या उडीदाची खरेदी होणार असल्याचे संकेत जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव म्हणाले.
११ डिसेंबरला एसएमएस आल्यानंतर उडीद घेऊन आलो. टोकन मागितले. अद्याप उडीद विक्री झाली नसल्याचे किसन सानप, महादेव सानप म्हणाले.
दरम्यान, भाकप गुरुवारी बाजारसमितीसमोर निदर्शने करणार असल्याचे ज्योतीराम हुरकुडे, उत्तम सानप, एस. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.