कापसाच्या दोड्यांना अळ्यांची भीती - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:38 AM2021-08-17T04:38:31+5:302021-08-17T04:38:31+5:30
भगर, बाजरीवर चिमण्यांचा थवा शिरूर कासार : तालुक्यात भारी रानात आता बाजरी व मगरीचे पीक चिकाळ्यात आले असून, चिमण्या ...
भगर, बाजरीवर चिमण्यांचा थवा
शिरूर कासार : तालुक्यात भारी रानात आता बाजरी व मगरीचे पीक चिकाळ्यात आले असून, चिमण्या त्यावर झोंबत असून, कोवळे दाणे खात असल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतात चिमण्या पाखरांना मूग, बाजरी, भगर ही पिके खाद्य म्हणून असल्याने, सकाळ-संध्याकाळ शेतशिवारात चिमण्यांचे थवे कणसावर दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
शिरूर कासार : जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. परिणामी, शेत पिकांना चांगलाच फटका बसला आहे. काही शेतात मूग तोडणी, भगर काढणीला आली आहे. अशातच हवामान खात्याने येत्या सोळा सतरा तारखेला पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने, हताश शेतकरी पुन्हा एकदा त्या तारखेकडे लक्ष लावून बसला आहे. अंदाज हा खरा ठरला, तर हाती आलेले घरघरच्या पुरते वाण वाया जाऊ नये, यासाठी ते काढणी करून झाकून ठेवण्यात शेतकरी व्यस्त आहे.
मंदिरातील भूपाळीचा आवाज बंद
शिरूर कासार : कोरोना महामारीच्या अनुषंगाने मंदिराच्या दरवाजाला कुलूप आहे. सध्या श्रावण सुरू असून, या महिन्यात ठिकठिकाणच्या मंदिरात पोथी, भजन, सप्ताह, काकडा आदी कार्यक्रमाची रेलचेल असते. मात्र, या सर्व कार्यक्रमांवर कोरोनाने बंधन घातले असल्याने, मंदिरात पहाटेच्या भूपाळीचा आवाज बंद दिसून येत आहे. परंपरेत व नित्य नियमात खोडा नको, म्हणून गाजावाजा न करता मोजक्याच उपस्थितीत भाविक परंपरा चालू ठेवत आहे.
सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
शिरूर कासार : सतत ढगाळ वातावरण आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सध्या सर्दी, पडसे, खोकला या आजाराने त्रस्त करून सोडले आहे, धोका नको, म्हणून ताबडतोब दवाखाना गाठला जात आहे. सध्या याच आजाराचे रुग्ण दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे डॉक्टर सांगतात.