पुराच्या भीतीने राजापूरकरांची आठवड्यापासून झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:29+5:302021-09-08T04:40:29+5:30
राजेश राजगुरू तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा ...
राजेश राजगुरू
तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा संपेपर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.
याच भीतीने तालुक्यातील राजापूर येथील ग्रामस्थ झोपलेच नाहीत. या परिसरात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. राजापूरच्या उत्तर बाजूने गोदावरी नदी वाहते, तर उर्वरित सर्व बाजूंनी नदी नाल्यांनी गावाला घेरलेले आहे. गोदावरीला पूर असो किंवा नसो, पण थोडा जरी पाऊस पडला की या ओढ्या, नाल्यांना पूर येऊन गावाचा संपर्क तुटतो.
गावातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर एक नदी व एक नाला आडवा येतो. यातील नाल्यावरील पुलावरून पूर्ण पावसाळाभर पाणी वाहत असल्यासारखेच असते. त्यात थोडा जास्त पाऊस झाला की या नाल्यावरील पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह वाहत असतो. त्यामुळे पावसाळ्यात गोदाकावरील राजापूर या गावांतील लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.
सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दररोज मुसळधार पाऊस पडत असल्याने आठ दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटल्यातच जमा आहे.
त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक पाणीपातळी वाढून पूर येतो की काय या शंकेने या गावातील पुरुष, महिला, मुलांबाळासह रात्र जागून काढत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या गावातील लोक झोपलेच नाहीत.
गावातून बाहेर निघण्यास रस्ता नाही. त्यात पाऊस चालू असतो आणि अचानक पाणी पातळी वाढली तर काय करायचे? या विचाराच्या तंद्रीत गावातील सर्वच लोकांची आठ दिवसांपासून झोप उडाली आहे.
कायम पुनर्वसन करण्याची मागणी
राजापूर हे गाव थोडा पाऊस आला तरी चोहोबाजूंनी पाण्याने घेरले जात असते. ही स्थिती प्रत्येक पावसाळ्यात असते,त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.