बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने घराची रजिस्ट्री करून घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:26+5:302021-01-22T04:30:26+5:30
बीड : वडिलांना व्याजाने दिलेली १५ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या दोन मुलींना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने मुख्य रस्त्यावर ...
बीड : वडिलांना व्याजाने दिलेली १५ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या दोन मुलींना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने मुख्य रस्त्यावर त्यांच्या सह्या घेऊन घराची बनावट रजिस्ट्री केल्याच्या आरोपावरून बीडचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या दोन मुलांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी शाहिस्ता तरन्नुम अर्शद खान (रा. झमझम कॉलनी, बीड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील शेख मोहम्मद शरीफ हे बांधकाम व्यवसायिक आहेत. चार वर्षापूर्वी त्यांनी शाहिस्ता आणि त्यांची बहीण इशरत यांच्या नावे दोन मजली घराची रजिस्ट्री करून दिली आहे. सध्या दोन्ही बहिणी त्यांच्या कुटुंबासह याच घरात राहतात. त्यांच्या वडिलांनी एका वर्षापूर्वी माजी नगरसेवक जलीलखान रजाखान पठाण यांच्याकडून व्यवसायासाठी १५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. जलीलखान आणि त्यांची दोन मुले साजेदखान आणि वाजेदखान हे तिघे सतत शाहिस्ता यांच्या घरी येऊन घर रिकामे करण्यासाठी तगादा लावतात आणि जीवे मारण्याच्या धमक्या देतात. वडिलांसोबत झालेला व्यवहार हा तुम्ही दोघे बघून घ्या, हे घर आमच्या नावावर असून याच्याशी तुमचा काही संबंध नाही असे शाहिस्ता यांनी अनेकदा त्यांना बजावले आहे. जानेवारी २०१९ मध्ये त्या तिघांनी शाहिस्ता आणि इशरत यांना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेले आणि मुखत्यारनाम्यावर सह्या घेतल्या. त्या आधारे जलीलखान यांनी मागील महिन्यात त्यांची मुलगी रिजवाना बेगम हिच्या नावाने बनावट रजिस्ट्री केली. सदर फिर्यादीवरून जलीलखान, साजेदखान आणि वाजेदखान या तिघांवर बीड शहर ठाण्यात फसवणुकीसह शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.