गुन्हेगारांना पकडण्यात सहकार्य करणार्या नागरिकांचा बीड पोलिसांनी केला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:27 PM2018-01-23T15:27:21+5:302018-01-23T15:36:36+5:30
विविध चार गुन्ह्यांमध्ये चोर व इतर आरोपी पकडण्यात बीड जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करणार्या १० सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आज केला.
बीड : विविध चार गुन्ह्यांमध्ये चोर व इतर आरोपी पकडण्यात बीड जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करणार्या १० सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. आज दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात हा गौरवाचा सोहळा पार पडला.
गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पोलीस दल राज्यात पाचव्या तर मराठवाड्यात पहिल्या स्थानी आले. त्यामुळे जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचावत असतानाच मंगळवारी आणखी एक आदर्श कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करून पळून जाणार्या चोरट्यांचा पाठलाग नागरिकांनी केला. यामध्ये एक चोर विहिरीत पडला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ शिरूर पोलिसांना माहिती दिली. येथील पाच नागरिकांच्या सहकार्यामुळे एका चोराला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर परळी ग्रामीण व परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतही चार सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांना वेळीच माहिती दिली. येथेही तीन चोरांना पकडण्यात आले होते. तसेच आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराला पकडण्यात एका व्यक्तीने महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच्या माहितीवरूनच सराईत गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले होते. या सर्वांचा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गौरव केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची उपस्थिती होती. या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास दुणावला आहे.
नागरिकांच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढला
गुन्हेगारी रोखण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. यापुढेही जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगार जेरबंद करण्यासाठी आमचे सर्व पोलीस दल कार्यरत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. पोलीस दलाला सहकार्य केल्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला असून नागरिकांमध्येही पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. कुठलीही माहिती मिळाली तर तात्काळ पोलिसांना कळवा, आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच आपला जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सन्मानही केला जाईल, असे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले.