बांधकाम विभागाची महिला कर्मचारी बेपत्ता
By admin | Published: January 4, 2016 12:19 AM2016-01-04T00:19:22+5:302016-01-04T00:30:24+5:30
पतीची तक्रार : मूळच्या लातूरच्या
वैभववाडी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला कर्मचारी नंदना विशाल टिके (वय २६, रा. लातूर) या शनिवारी सकाळी करुळ घाटातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. दोन वर्षांच्या मुलीला पतीकडे ठेवून करुळ घाटात कामावर गेलेल्या टिके तब्येतीचे कारण सांगून घरी निघाल्या. मात्र, दुपारी ‘माझा शोध घेऊ नका’, असा दूरध्वनी केल्याचे पती विशाल टिके यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे नंदना टिके यांच्या बेपत्ता होण्यामागे गूढ असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
मूळच्या लातूर येथील नंदना टिके सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडी उपविभागात २४ नोव्हेंबरला रुजू झाल्या. त्या शहरातील डांगे चाळ येथे राहतात. शनिवारी सकाळी ९.३० वाजता नंदना आपल्या दोन वर्षांच्या मुलीला पतीकडे ठेवून नेहमीप्रमाणे कामाला गेल्या. तेथून सहकारी रस्ता कामगारांसमवेत त्या करुळ घाटात कामाला गेल्या होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास
येथील सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी शहाबुद्दीन डांगे यांना आपली तब्येत बरी नसल्याचे सांगून त्या घाटातून निघाल्या.
परंतु, नंदना यांनी घरी न येता दुपारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘माझा शोध घेऊ नका’, असे सांगितल्याचे पती विशाल टिके यांनी तक्रारीत म्हटले आहे. नंदना घरी न आल्यामुळे विशाल टिके यांनी लहान मुलीला आपल्याकडे ठेवून त्या बेपत्ता झाल्याची तक्रार रविवारी वैभववाडी पोलिसांत दिली. दरम्यान, नंदना कामावरून बेपत्ता झाल्यामुळे बांधकाम विभागाचे कर्मचारीही चिंताग्रस्त आहेत. या प्रकरणाचा तपास बी. ए. कदम करीत आहेत. (प्रतिनिधी)