स्त्री भ्रूण हत्येच्या कारखान्याचा विजयमालाच्या मृत्यूने झाला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 05:10 PM2019-02-09T17:10:23+5:302019-02-09T17:21:27+5:30
या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती.
बीड : गर्भपातानंतर विजयमाला महादेव पटेकर या महिलेचा मृत्यू झाल्याने परळीतील भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती.
धारूर तालुक्यातील भोपा येथील रहिवासी विजयमाला महादेव पटेकर या महिलेला चार मुली होत्या. पाचव्यांदा गर्भवती असताना १७ मे २०१२ रोजी पती महादेव पटेवार हा तिला डॉ. मुंडेच्या परळी येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन गेला होता. त्यानंतर डॉ. सुदाम मुंडे याने त्या महिलेचे जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हेच्या रुग्णालयात गर्भलिंग निदान करुन घेतले होते. त्यामध्ये पाचवे अपत्य हे मुलगी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर १८ मे २०१२ रोजी परळी येथील मुंडे दाम्पत्याच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला. त्यावेळी अति रक्तस्त्राव झाल्याने विजयमालाचा मृत्यू झाला होता.
ही माहिती डॉ.सुदाम मुंडे याने परळी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलीस व तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी मुंडे रुग्णालयाची पाहणी केली. या रुग्णालयाला १० खाटांची परवानगी असताना मुंडे हॉस्पिटलमध्ये ६० खोल्या व ११४ खाटांची निर्मिती केली गेली होती. त्यामुळे संशय आल्याने तपास करण्यात आला असता धक्कादायक माहिती हाती आली होती. अवैधरीत्या गर्भपात, गर्भलिंगनिदान व सदोष मनुष्यवधासह इतर कलमाअंतर्गत डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे व मयत महिलेचा पती महादेव पटेकरविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी स्वाती भोर यांनी केला.
मुंडे दाम्पत्य तेव्हा झाले होते फरार
या प्रकरणात ३०४ अ या गुन्ह्यामध्ये डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे यांना जामीन मिळाला होता. मात्र पुन्हा ३०४/१३/१४/१५/१८ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करण्यासाठी अधिकारी गेले असता मुंडे दाम्पत्य फरार झाले होते. त्यांना फरार करण्यास मदत करणाऱ्या तसेच हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केलेल्या लोकांना आरोपी करून गुन्हे दाखल करण्यात आले. मुंडे दाम्पत्याला अटक केल्यानंतर याप्रकरणी १७ जणांविरोधात दोषरोपपत्र दाखल केले होते. नंतर हे प्रकरण अंबाजोगाई न्यायालयात काही दिवस चालवले.
मुंडे होता नाशिक कारागृहात
गेली साडे सहा वर्षे सुदाम मुंडे हा नाशिक कारागृहात होता. हा कालावधी वजा करून त्याला उर्वरित शिक्षा भोगावी लागणार आहे. त्याची पत्नी सरस्वती मुंडे जामिनावर बाहेर होती. शिक्षा सुनावताच पोलिसांनी परळीतून तिला ताब्यात घेतले.
या पाच जणांची साक्ष :
सातारा येथील अॅड. शैलजा जाधव, गरोदर माता प्रेरणा भिल्लारे, परळीचे तत्कालीन नायब तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, विभागीय कार्यालयातील राजेंद्र जोशी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.
दया दाखवावी :
आमचे वय खूप आहे. आम्ही आजारी आहोत. वरिष्ठ नागरिक असल्याने न्यायालयाने दया दाखवावी व शिक्षा कमी करावी असा युक्तिवाद मुंडे दाम्पत्याने केला.
साक्षीदार झाले होते फितूर
अंबाजोगाई न्यायालयात सहा पंच साक्षीदार फितूर झाले होते. त्यानंतर हे प्रकरण बीड जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणात २८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील २२ साक्षीदार फितूर झाले होते. प्रथम सत्र न्या. एस.आर कदम त्यांच्यासमोर साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यांच्या बदलीनंतर दुसरे सत्र न्या. ए .एस गांधी यांच्यासमक्ष हे प्रकरण चालले. विशेष बाब म्हणून या प्रकरणात साक्षीदार फितूर झाल्यानंतर सरकारी पंच, शवविच्छेदन केलेले डॉक्टर, पोलीस व तपासी अधिकारी यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे दोषींना शिक्षा मिळण्यास मदत झाल्याचे सहायक सरकारी वकील मिलींद वाघिरकर यांनी सांगितले.
असे केले होते स्टिंग
सुदाम मुंडेच्या रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘लेक लाडकी अभियान’च्या प्रमुख वर्षा देशपांडे, अॅड. शैलजा जाधव यांनी स्टिंग आॅपरेशन केले. सातारा येथून प्रेरणा भिल्लारे नावाच्या गर्भवतीला बनावट रुग्ण म्हणून १९ सप्टेंबर २०१० रोजी मुंडेच्या रूग्णालयात पाठविले. डॉ. मुंडेने ५०० रुपयांत तिची सोनोग्राफी केली. तिच्या हाती एक चिठ्ठी लिहून देत ‘१बी’ म्हणजेच गर्भात मुलगा असल्याचा उल्लेख केला. हे स्टिंग जाहीर झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर दोन दिवसांनी परळी उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास दुधाळ यांनी केलेल्या तपासणीत रुग्णालयात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले होते. पुढे नायब तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सातारा येथे जाऊन तिघींचे जबाब घेतले होते. मुंडेने निदान केलेल्या भिल्लोरेला मुलगाच झाला होता.
गर्भातच खुडल्या हजारो कळ्या !
आरोपी डॉ.सुदाम मुंडे, डॉ.सरस्वती मुंडे यांनी परळी शहरातील सुभाष चौकातील एका वाड्यात टेबल व दोन खुर्च्या टाकून दवाखाना सुरू केला होता. परमार कॉलनीत भाड्याच्या घरात हे दोघे राहायचे. मुंडे दाम्पत्याची प्रॅक्टिस वाढल्यानंतर बसस्थानकापुढील जागेत ३० वर्षांपूर्वी मोठे रुग्णालय बांधले व मुंडे हॉस्पिटल असे त्याचे नाव दिले होते. डॉ. सुदाम मुंडे निष्णात सर्जन तर पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ. त्यामुळे या व्यवसायातून मुंडे दाम्पत्याने कमाईचा वेगळा मार्ग शोधला. गर्भपातासाठी परळीतील हा दवाखाना चर्चेत आला. या हॉस्पीटलमध्ये गर्भातच हजारो कळ्या खुडल्या होत्या, अशी खळबळजनक माहिती तेव्हा समोर आली होती.
अर्भकांची विल्हेवाट...
गर्भपातासाठी येणारा रुग्ण व त्याची आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत किंमत ठरायची. त्यानंतर रुग्ण दाखल करायचा मात्र कागदपत्रांवर कसलीही नोंद नसायची. सर्व काम ठरलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकरवी व्हायचे. तपासणीनंतर भूल देऊन गर्भपात व नंतरचे तत्कालिक उपचार केले जायचे. गर्भपात केलेले भ्रूण एका जीपद्वारे परळीलगत नंदागौळ रस्त्यावरील शेतात पुरले जायचे. तेथे कुत्रेही पाळलेले होते. यंत्रणेच्या नजरेतून सुटण्यासाठी अनेकदा बाहेरील सेटींग झालेल्या रेडिओलॉजिस्ट व डॉक्टरांकडे रुग्ण पाठवून सोनोग्राफी केली जायची. त्यानंतर परळीतील तारीख ठरायची.