जुन्या दराची पावती देत खतविक्रेत्यांची वरकमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:40+5:302021-04-14T04:30:40+5:30
माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने ...
माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने काही काळासाठी थांबवली आहे. ही भाववाढ नक्कीच होणार असल्याने येथील व्यापाऱ्यांनी खतविक्री थांबवली आहे. अडलेल्या शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत जुन्या भावात पावत्या देण्याचा गोरखधंदा सुरू केला असताना मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
मागील दहा वर्षांपासून खत बनवणाऱ्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, या कंपन्यांनी दहा वर्षात क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपयांची भाववाढ केली. या भाववाढीच्या विरोधात शेतकरी संघटनेने आवाज न उठवल्याने या कंपन्यांचे फावले. आपण भाववाढ केली तरी कोणी काही बोलत नसल्याने या कंपन्यांनी १ एप्रिल रोजी अचानक खतांची भाववाढ केली. ही भाववाढ थोडीथोडकी नसून क्विंटलमागे तब्बल एक ते दीड हजार रुपयांची झाली आहे. ही भाववाढ केंद्र सरकारने तात्पुरती थांबली आहे. मात्र पुढील काळात ही भाववाढ नक्कीच कायम राहील, असा अंदाज बांधत येथील खतविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असणारे खताचे साठे विक्री करणे थांबवले आहे. एखाद्या शेतकऱ्याला खताची खूपच आवश्यकता असल्यास त्यास चढ्या भावाने खत दिले जात असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. असे असताना येथील कृषी अधिकाऱ्याकडून मात्र कानावर हात ठेवले जात आहेत.
व्यापाऱ्यांचे गुदाम तपासा
केंद्र व राज्य सरकारशी संगनमत करून खत बनवणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर खतांची भाववाढ केली असून, याविरोधात आम्ही आंदोलन पुकारणार आहोत. सध्या येथील व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने खताची विक्री होत असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र गप्प आहेत. त्यांनी दोन दिवसात संबंधित व्यापाऱ्यांचे गुदाम तपासावेत नसता या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.
--- ॲड. नारायण गोले, पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष, माजलगाव
खतांची अद्याप भाववाढ झालेली नाही. त्यामुळे व्यापारी चढ्या भावाने खतविक्री करू शकत नाहीत. असे कोणी करत असेल तर कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी. यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.
---सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव