कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:08+5:302021-08-22T04:36:08+5:30

बीड : कोरोनाचे संकट टळलेले नसताना लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांना येणारा ताप किंवा शरीरावर ...

Fever, acne can be measles at any age | कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

Next

बीड : कोरोनाचे संकट टळलेले नसताना लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांना येणारा ताप किंवा शरीरावर येणारे पुरळ हा गोवर किंवा रुबेलासारखा घातक संसर्गजन्य आजारही असू शकतो. पूर्वी एक ते दीड वर्षापर्यंतच्या मुलांना हा आजार व्हायचा; पण आता कुठल्याही वयोगटातील मुलांना याची लागण होण्याची शक्यता वाढली आहे.

गोवर हा विषाणूंपासून होणार संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तींकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. रुबेला हादेखील विषाणूजन्य आजार असून, त्याची लक्षणेही गोवरप्रमाणेच असतात. गोवरची पहिली लस नऊ ते बारा महिने आणि दुसरी लस १६ ते १८ महिने या वयोगटात दिली जाते. पहिल्या लसीनंतर ८५ टक्के, तर दुसऱ्या लसीमुळे ९५ टक्के प्रतिकारशक्ती वाढते.

...

...असे केले जाते निदान

१ - गोवर आणि रुबेलावर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

२- असे असले तरी आता हा आजार लहान मुलांसोबत मोठ्यांमध्येही आढळून येत आहे.

३- त्यामुळे कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप आणि पुरळ असल्यास ते गाेवर किंवा रुबेलाचे लक्षण असू शकते.

.....

३० टक्के गोवर- रुबेलाचे लसीकरण

- एक ते दीड वर्षापर्यंतच्या बालकांना गोवर - रुबेलाचे लसीकरण केले जाते. जिल्ह्यात सरासरी ५२ हजार बालके हे एक ते दीड वर्षे वयोगटातील आहेत. त्यांना गोवर व रुबेलाचे शंभर टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण ३० टक्के इतके आहे. कोविडमुळे या लसीकरण मोहिमेला काहीशी खीळ बसली होती.

...

...तर डॉक्टरांना दाखवा

तीव्र ताप, शरीरावर पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. पुरळ प्रथम कपाळावर, मानेवर व कानामागे येतात. नंतर ते हातापायांपर्यंत पसरतात. आठवडाभराने ते कमी होतात. यातून मेंदुज्वर, अतिसार असे आजार बळावण्याची भीती असते. क्वचितप्रसंगी गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे गरजेचे आहे.

...

काळजी गरजेची

गोवरपासून बालकांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी. आजारी व्यक्तींच्या संपर्कात बालकांना येऊ देऊ नये. हात वारंवार स्वच्छ धुवावेत. सकस आहार देऊन अ जीवनसत्त्वाची कमतरता भासू देऊ नये. वेळावेळी लसीकरणदेखील महत्त्वाचे आहे. ताप, पुरळ आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

-डॉ. संजय जनावळे, बालरोगतज्ज्ञ, बीड

....

Web Title: Fever, acne can be measles at any age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.