वेअर हाउसला भीषण आग, संशयाचा धूर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:02+5:302021-03-04T05:02:02+5:30
बीड : तालुक्यातील जप्ती पारगाव जवळ असलेल्या एका वेअर हाउसला मोठी आग आगाली आहे. या आगीमध्ये शासनाने व काही ...
बीड : तालुक्यातील जप्ती पारगाव जवळ असलेल्या एका वेअर हाउसला मोठी आग आगाली आहे. या आगीमध्ये शासनाने व काही खासगी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या असून, जवळपास ५० ते ५५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वेअर हाउस चालकांकडून व्यक्त करण्यात आला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान घडली, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ ते १५ गाड्या मध्यरात्रीपासून कार्यरत होत्या. मात्र, मोठ्या प्रमाणात गाठी असल्यामुळे आग आटोक्यात आलेली नव्हती. वेअर हाउसमध्ये वीज नसते, त्यामुळे आग लागण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, आग लागली की लावली, असा संशय व्यक्त होत आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या जप्ती पारगाव येथे खिंवसरा, नहार, कोटेचा, बागमार या चौघांचे वेअर हाऊस आहे. ते बुलडाणा अर्बनने भाड्याने घेतले होते. यामध्ये पणन महासंघाच्या २१ हजार १५० व खासगी व्यापारी व जिनिंगच्या ५ हजार ५१ अशा मिळून २६ हजार २०१ कापसाच्या गाठी गोदामात ठेवलेल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान या ठिकाणी आग लागली. ही माहिती जप्ती पारगाव येथील नागरिकांनी गोदाम मालकांना दिली. त्यानंतर, गेवराई आणि बीड येथील बाजार समिती, तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, आग एवढी मोठी होती की, उपलब्ध बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे पुन्हा माजलगाव, परळी, औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल. जवळपास १२ ते १५ वाहनांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न मध्यरात्रीपासून अग्निशमनचे जवान करत होते. मात्र, त्या ठिकाणी जवळ पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग विझविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, या आगीत सर्वकाही भस्मसात झाले असून, किमान आठ दिवस आग धगधगत राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत गोदाम मालकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, आग पूर्ण विझल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटी लि. गोदाम
पणन महासंघाच्या कापूस गाठी गोदामात ठेवण्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेसोबत करार झालेला आहे. जप्ती पारगाव येथील गोदाम देखील बुलढाणा बँकेने किरायाने घेऊन त्याठिकाणी पणन महासंघाने गाठी ठेवल्या होत्या, या गोदामाला आग लागली आहे. दरम्यान औरंगाबाद तालुक्यातील गंगापूर येथील धान्य गोदामाला देखील आग लागली होती. त्यामुळे संशय व्यक्त केला जात असून, शासनाची फसवणूक टाळण्यासाठी सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
अग्निरोधक व्यवस्था नाही
जप्ती पारगाव येथील वेअर हाऊस येथे कापसाच्या गाठी ठेवल्या होत्या. गोदामात वीज कनेक्शन नव्हते, तर आग कशी लागली? गोदामात आगरोधक कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नेमकी आग कशी लागली? हे पोलीस तपासात उघड होईल.
===Photopath===
020321\022_bed_22_02032021_14.jpg~020321\022_bed_21_02032021_14.jpg
===Caption===
आगीत भस्मसात झालेल्या कापसाच्या गाठी ~आग विझविण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान