‘आमचा गाव, आमची जबाबदारी’ मोहिमेतून कोरानाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:45+5:302021-04-15T04:31:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : तालुक्यातील दौनापूरमध्ये महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे गावातील तरुणांनी ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील दौनापूरमध्ये महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे गावातील तरुणांनी ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीची वाट न बघता ‘आमचा गाव, आमची जबाबदारी’ मोहिमेतून गावामध्ये ५० लीटर सॅनिटायझरची फवारणी व २५ लीटर सॅनिटायजरचे वाटप केल्याची माहिती स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब प्रतिष्ठानचे राजेश अघाव यांनी दिली.
परळी तालुक्यातील दौनापूर हे तीन हजारांच्या आसपास वस्ती असलेले गाव गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. येथे महिनाभरात जवळपास ३० ते ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही रुग्ण हे सरकारी कोविड सेंटर व काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात संसर्ग वाढल्यामुळे अनेकजण ताप, डोके, सर्दी, खोकला व अंगदुखीने बेजार आहेत. यासाठी तपासणी केली तर पॉझिटिव्ह निघू, या भीतीने तपासणी करण्यास घाबरत आहेत. औषध, गोळ्या घेऊन दुखणे अंगावर काढत आहेत. त्यामुळे रुग्ण व संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तो हाताबाहेर जाऊ नये, त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासन, प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या मदतीची वाट न बघता, गावातील तरुणांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्याने गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केली. तसेच गावातील प्रत्येक घर फवारून जनजागृती करण्यात आली. लोकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली. या फवारणीसाठी मनोज कराड, प्रदीप नानवटे, चंद्रप्रकाश मिटकरी, विष्णूपंत आघाव, विकास आघाव, संभाजी आघाव यांनी विशेष सहकार्य केले.
या मोहिमेसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे युवा नेते राजेश प्रभाकर आघाव, विनोद नानवटे, राजेभाऊ आघाव, मुंजा आघाव, लक्ष्मण नानवटे, भगवान कराड, लखन नानवटे, विकास नानवटे, कृष्णा बनसोडे, समाधान राख, यादव बप्पा आघाव, उद्धव आघाव, माऊली मुळे आदींनी पुढाकार घेतला होता. या उपक्रमाला शिक्षक नेते श्याम आघाव, बंडू अघाव, ह. भ. प. विजयानंद महाराज अघाव, ॲड. केशव अघाव, बळीराम डिगंबर आघाव, कमलाकर मुळे, कल्याण भाऊ नानवटे, सिद्राम नानवटे यांचे मार्गदर्शन लाभले. शासन व प्रशासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे गावात सर्वांनी काटेकोर व तंतोतंत पालन करून गावातून कोरोना संसर्ग हद्दपार करण्याचे गावकऱ्यांनी ठरवले आहे.
===Photopath===
140421\img-20210410-wa0451_14.jpg