ओबीसी आरक्षण बचावचा लढा तीव्र; पुढाऱ्यांसाठी हातोलाकरांनी बंद केली गावची वेस!
By सोमनाथ खताळ | Published: June 21, 2024 07:59 PM2024-06-21T19:59:22+5:302024-06-21T19:59:52+5:30
आंदोलनाची धग वाढत चालली असून हातोला पाठोपाठ खिळद येथेही उपोषण सुरू करण्यात आले आहे.
- नितीन कांबळे
कडा- वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलनाच्या समर्थनार्थ चार दिवसांपासून हातोल्यासह परिसरातील नागरिक उपोषणास बसले आहेत. उपोषणाची दखल घेतली गेली नसल्याने हातोलाकरांनी एकमुखी निर्णय घेत गावात फलक लावून राजकीय पुढाऱ्यांसाठी गावची वेस बंद केली आहे. दिवसेंदिवस ओबीसी आंदोलनाचा लढा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे.याची राज्य सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलनाची धग तीव्र होत आहे. हाके यांच्या समर्थनार्थ आष्टी तालुक्यातील हातोला येथे १७ जून पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाचा आज ४ था दिवस आहे. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने गावासह परिसरातील नागरिकांनी गावची वेस राजकीय पुढाऱ्यांसाठी बंद केली आहे. तालुक्यात देखील आंदोलनाची धग वाढत चालली असून हातोला पाठोपाठ खिळद येथेही उपोषण सुरू करण्यात आले आहे.