फौजदारावर निलंबनाची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:17 AM2017-11-28T00:17:41+5:302017-11-28T00:17:48+5:30
धारूर पोलीस ठाण्यातून आरोपीने पलायन केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी येथील फौजदार एस. यू. मरळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. उशिरापर्यंत निलंबनाचे आदेश निघाले नव्हते.
बीड : धारूर पोलीस ठाण्यातून आरोपीने पलायन केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी येथील फौजदार एस. यू. मरळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. उशिरापर्यंत निलंबनाचे आदेश निघाले नव्हते.
कुख्यात लुटारू विलास बडे याला मरळ यांनी रविवारी सायंकाळी चौकशीसाठी लॉकअप बाहेर काढले होते. थोडा वेळासाठी ते व्यस्त झाले. हीच संधी साधून विलासने धूम ठोकली होती. रात्रभर जिल्ह्यात नाकाबंदी करून शेजारील जिल्ह्यांत कल्पना देण्यात आली होती. परंतु तो हाती लागला नाही. कामात निष्काळजीपणा करणा-या मरळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात तात्काळ अजित बोराडे यांनी जी.श्रीधर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. उशिरापर्यंत आदेश निघाले नव्हते. श्रीधर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वरिष्ठांना उशिराने माहिती
आरोपी पळून गेल्यानंतर येथील ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंदम व फौजदार मरळ यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तब्बल तीन तास उशिराने माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोपीचा शोध सुरूच
आरोपीचा शोध सुरूच आहे. या घटनेला जबाबदार व निष्काळजीपणा करणा-या अधिका-याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
अजित बोराडे
अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई
चौकशीसाठी बडेला लॉकअपमधनू बाहेर काढले होते. एवढ्यात काही लोकांचा जमाव फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आला. मी त्यांच्याकडे गेलो. परत आल्यावर आरोपी पळून गेल्याचे समजले. वरिष्ठांना ही माहिती मी तात्काळ दिली होती.
फौजदार एस. यू. मरळ
पोलीस ठाणे, धारूर