भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By शिरीष शिंदे | Published: April 24, 2023 06:39 PM2023-04-24T18:39:02+5:302023-04-24T18:39:28+5:30
शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड: जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन मावेजा वाटपात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून संगनमताने अपहार करून तक्रारी नंतर संचिका गायब करण्यात आल्या आहे. या प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संबंधित शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले.
संचिका गहाळ प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच चौकशीस जाणिवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुस्ताक , शेख मुबीन, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, बाबासाहेब मेंगडे, गवळण मेंगडे, रावसाहेब मेंगडे, अमोल मेंगडे, भिमराव बांगर, विठ्ठल जाधव, विजय ईगडे आदी सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
शासनाची दिशाभूल करत फसवणूक
पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी येथील गट क्रमांक १०० गाव तलाव क्र.५ मध्ये माझ्या जमिनीवर तलाव बांधण्यात आला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांनी १ कोटी ४६ लाख रुपये बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल करत फसवणूक केली. संबंधित प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करून मला मावेजा देण्यात यावा
- बाबासाहेब मेंगडे, शेतकरी, मेंगडेवारी, ता. पाटोदा