पोलीस उपअधीक्षक जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:29+5:302021-07-09T04:22:29+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व जातीवर शिव्या दिल्या. या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करा, या मागणीसाठी बुधवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवार रोजीही सुरूच होते.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना जि. प. सदस्य राजेसाहेब देशमुख म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करावेत व त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची प्रमुख मागणी आहे. या प्रकरणात चौकशीच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने विलास यादव यांना नाहक मारहाण केली आहे, हे योग्य नाही.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माधव जाधव यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी सुरू झालेले ठिय्या आंदोलन गुरुवार रोजीही सुरूच होते. मागण्या मान्य केल्याशिवाय व यादव कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. गुरुवारपासून आजुबाजूच्या गावातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. या आंदोलनाची व्याप्ती आता आणखी वाढली असून अंबाजोगाई तालुक्यासह आजुबाजूच्या तालुक्यातील कार्यकर्ते देखील ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत, असे समन्वयक जाधव म्हणाले.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांना दिली. गृहमंत्री यांनी कार्यवाहीचे आश्वासन देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन दिली.
या आंदोलनात गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. माधव जाधव, नंदकिशोर मुंदडा, अशोकराव देशमुख, अशोक गुंजाळ, राजेसाहेब देशमुख, नगरसेवक बबन लोमटे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंत मोरे, नगरसेवक सारंग पुजारी, डॉ. नंदकिशोर सोमवंशी, अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड. अजित लोमटे, आबासाहेब पांडे, महेश लोमटे, प्रा. प्रशांत जगताप, संजय भोसले आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
९ जुलै रोजी तळेगाव घाट, हातोला आणि बर्दापूर तसेच १० जुलै रोजी जवळगाव, पुस, गिरवली, धायगुडा पिंपळा आणि मगरवाडी येथील मराठा समाजबांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा, वंचित बहुजन आघाडी, क्षत्रीय मराठा, महाराष्ट्र कुणबी मराठा महासंघ, अखिल भारतीय किसान काँग्रेस आणि लोकजनशक्ती पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील बीड, परळी, धारूर येथेही गुरुवारी याप्रश्नी प्रशासनास निवेदने देण्यात आली.
080721\avinash mudegaonkar_img-20210708-wa0091_14.jpg