‘त्या’ चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:13 AM2018-08-19T01:13:05+5:302018-08-19T01:13:13+5:30
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी मयताच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच संबंधित चार पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचाही आदेश दिला.
औरंगाबाद / बीड : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी मयताच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच संबंधित चार पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचाही आदेश दिला.
मयत शेख मोहम्मदच्या नातेवाईकांनी अॅड. सईद शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार मयत शेख मोहम्मद हा केज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहे. तो २६ आॅगस्ट २०१५ रोजी सकाळी ७ वाजता घरातून कामासाठी बाहेर पडला. पोलिसांनी आरोपीला केज सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती त्याच्या भावाला दुपारी एक वाजता मिळाली.
तसेच तो गंभीर जखमी अवस्थेत असल्याचेही समजले. त्याचा भाऊ व नातेवाईक दवाखान्यात पोहोचले. त्यावेळी पोलीस आरोपीला अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्याच्या तयारीत होते. आरोपी हा बेशुद्ध होता. त्याच्या नाक, कान व तोंडातून रक्त वाहत होते. अंबाजोगाईला पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मोहम्मद मयत झाल्याचे घोषित केले. त्याविरोधात सदर याचिका दाखल करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीला त्याच्या गावी घेऊन जातांना, त्याने चालत्या गाडीतून उडी घेतल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु नातेवाईकांना पोलिसांच्या भूमिकेवर संशय आला. त्यांनी संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. ही मागणी पोलिसांनी फेटाळली व प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविल्याचे सांगितले.
सुनावणीअंती आरोपीला दिलेल्या अमानवीय वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून खंडपीठाने पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. पोलीस शिपाई शंकर राठोड, राजाराम फुफाटे, नारायण मिसाळ व पोलीस चालक येवले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी बचावासाठी सांगितलेला घटनाक्रम व प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाबावरही खंडपीठाने साशंकता व्यक्ती केली.
पोलीस शिपायाकडून दिशानिर्देश व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन
या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तातडीने सोपवावा. सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांनी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडून या मृत्यूप्रकरणाची चौकशी करावी व पंधरा दिवसांमध्ये अहवाल मागवावा. चार महिन्यांत या संपूर्ण प्रकरण निर्णयाप्रत न्यावे. तपास अधिकाºयांना या प्रकरणात व्याप्ती वाढविण्याचे व संबंधित इतर व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्याची मुभाही खंडपीठाने दिली आहे.
पोलीस शिपाई शंकर राठोड याने आरोपीला ताब्यात घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देश व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरोधात खंडपीठाचे रजिस्टार (न्यायिक) यांनी सुमोटो अवमान प्रक्रिया सुरू करावी, असेही निकालात स्पष्ट केले. अॅड. शेख यांना अॅड. महेश भोसले व अॅड. क्यू. आर. सय्यद यांनी सहकार्य केले.