शांता राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:48+5:302021-03-04T05:02:48+5:30
परळी : शांता राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. केवळ आपल्या ...
परळी : शांता राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. केवळ आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचे कारस्थान शांताबाई राठोड यांनी रचले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम ५००,५०१,५०२ भादंवि व कलम ६६(अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करून कारवाई करावी, अशी तक्रार पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मंगळवारी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून शांता राठोड यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा केलेला आरोपही लहू चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे. तक्रारीत लहू चव्हाण म्हणाले की, माझी मुलगी पूजा चव्हाण यांचा पुणे येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणामध्ये विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे प्रकार करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी स्वतः २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे सांगितले आहे. १ मार्च रोजी शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने आरोप केले आहेत. माजी मंत्री संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडत नाहीत हा शांता राठोड यांनी केलेला आरोप खोटा आहे, असे लहू चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
पूजा चव्हाणचे प्रकरण दडपण्यासाठी पाच कोटी रुपये दिले आणि घरात, जमिनीत पुरून ठेवले आहेत. तसेच जावईमध्ये पैशासाठी भांडण सुरू आहेत, अशा प्रकारचे वक्तव्य करून शांता राठोड यांनी आपली व कुटुंबाची व जावई यांची बदनामी केली. या प्रकरणात मी कोणाकडूनही पैसे घेतले नाही तसेच मला कोणी दडपण्याचा प्रयत्न केला नाही अथवा पैसे घेण्याचे कुणीही आमिष दाखवलेले नाही, याउलट मी माझ्या मुलीच्या दुःखात असतानासुद्धा मला बदनाम करण्याच्या दृष्टीने काही जणांनी प्रयत्न केले आहेत. शांता राठोड यांचा माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही.