आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:25+5:302021-05-29T04:25:25+5:30
बीड : शेतीच्या वादातून सतत त्रास दिल्यामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना धारूर तालुक्यातील देवठाणा येथे २२ ...
बीड : शेतीच्या वादातून सतत त्रास दिल्यामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना धारूर तालुक्यातील देवठाणा येथे २२ मे रोजी घडली होती. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात २६ मे रोजी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौलत लिंबराव दोडके (वय ३२) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
दौलत यांची आई दैवशाला लिंबाराव दोडके यांच्या फिर्यादीनुसार दौलत व त्यांच्या पत्नीला भावकीतील काहीजण सतत शिवीगाळ करत होते तसेच मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देखील देत होते. आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी दौलत याला शेतातील गाजर गवत कापत असताना, आमच्या शेतातील गाजर गवत का कापले, या कारणावरून मारहाण करण्यात आली तसेच तो घरी आल्यानंतर त्याच्या मोबाईलवर फोन करून पत्नीला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या सततच्या मानसिक छळास कंटाळून दौलत दोडके यांनी शेतातील लिंबाच्या झाडास बैलाचा कासरा बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांची आई दैवशाला दोडके यांच्या फिर्यादीवरून २६ मे रोजी त्यांच्याच भावकीतील महेश छत्रभूज दोडके, सचिन दोडके, छत्रभूज दोडके, अरुणा दोडके, अर्चना सचिन दोडके, निता महेश दोडके (सर्व रा.देवठाणा ता.धारूर ) यांच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि एकशिंगे करत आहेत.