माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:42 PM2020-05-27T16:42:56+5:302020-05-27T16:45:13+5:30
24 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवक जिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर
माजलगाव : माजलगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा, शिवसेना व जगताप गटाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. यावर 24 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सहाल चाऊस हे मागील 30 वर्षांपासून नगरपालिकेत सातत्याने निवडून येत कधी अध्यक्ष तर कधी उपाध्यक्ष म्हणून कायम सत्तेत आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी सहाल चाऊस यांनी मोहन जगताप यांच्या माजलगाव जनविकास आघाडीतर्फे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवली होती. त्यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. यात ते विजयी ठरले व नगराध्यक्ष म्हणून निवडुन आले. ते निवडून आल्यापासुन नगरपालिकेस महाराष्ट्र शासनाने 50-60 कोटी रूपयांचा फंड दिला होता. हा फंड खर्च करण्यावरून नगराध्यक्ष व नगरसेवाकांमाद्ये वारंवार तु-तु , मै-मै होत असत.
दरम्यान, शहरात अनेक कामे न करताच बिले उचलण्यात आली असल्याने येथील काही नगरसेवकांनी मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. यात अनेक प्रकरणाची चौकशी देखील झाली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत आ.प्रकाश सोळंके निवडुन आले व सरकार देखील बदलल्याने चाऊस यांच्या अडचणीत वाढ झाली. नगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याने मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोनदा गुन्हे देखील दाखल झाले. त्यानंतर तपासात नगराध्यक्ष चाऊस यांचे नाव पुढे आले. त्यांना देखील अटक करण्यात आली असून मागील तीन महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत.
आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपालिका बरखास्त करण्याची तयारी सुरू केली असता राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप , शिवसेना व जगताप गटाच्या नगरसेवकांनी त्यांचे मन परिवर्तन केले. यानंतर केवळ नगराध्यक्ष चाऊस यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे ठरले. यानुसार बुधवारी 24 पैकी 19 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला. नगरसेवक विजय अलझेंडे फरार असून एक नगरसेवक चाऊस यांचा भाऊ व आघाडीचे नगरसेवक तालेब चाऊस असुन तैफीक पटेल , सय्यद नुर व एम.आय.एम.च्या नगरसेविका सुगराबी पाशा या चार नगरसेवकांनीच अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत.