अंतिम यादी आयुक्तांच्या दरबारात, आज निर्णयाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:04+5:302021-09-16T04:42:04+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी होणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा यंदाही लांबणीवर पडला. त्यानंतर १७ ...
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी होणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा यंदाही लांबणीवर पडला. त्यानंतर १७ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. पुरस्कारासाठी पात्रतेनुसार निवड केल्या जाणाऱ्या शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली; मात्र अंतिम मंजुरीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या दरबारात असल्याने त्यांच्या निर्णयानंतरच पुरस्कार सोहळा होऊ शकणार आहे.
जिल्हा शिक्षण विभागाकडून दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील समितीकडून पात्र ठरलेल्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांचे प्रस्ताव मागविले होते. यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी १०० प्रस्ताव आले होते. यातून ११ प्राथमिक , १० माध्यमिक व एक विशेष अशा २२ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती, समाजकल्याण सभापती, महिला बालकल्याण सभापती, डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश असलेल्या जिल्हा निवड समितीने पडताळणी केली. त्यानंतर संबंधित शिक्षकांचे चारित्र्य पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे हा प्रस्ताव मंजुरीला पाठविला होता. अंतिम यादीचा प्रस्ताव सध्या आयुक्तांच्या कार्यालयात आहे. बुधवारपर्यंत यावर निर्णय झाला नसल्याचे समजते. गुरुवारी दुपारपर्यंत निर्णय झाल्यास १७ सप्टेंबरच्या मुहूर्तावर पुरस्कार सोहळा होऊ शकणार आहे.