अखेर ४० दिवसानंतर श्वानाची 'मौत का कुंवा' मधून सुटका; प्राणिमित्रांच्या अथक प्रयत्नाने मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 11:04 AM2021-01-23T11:04:27+5:302021-01-23T11:04:54+5:30
चाळीस दिवसापासुन अन्न पाण्याविना विहीरीत पडलेल्या श्वानाला जिवदान
- नितीन कांबळे
कडा- एक दोन दिवस नव्हे तर तब्बल चाळीस दिवसांपासून अचानक विहिरीत पडलेल्या श्वानाला अखेर जीवदान मिळाले आहे. अन्न पाण्याविना विहिरीत असलेल्या या श्वानाची माहिती मिळताच कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी जिवाची पर्वा न करता त्याला शुक्रवारी सायकांळी अथक प्रयत्न करून बाहेर काढून त्याची 'मौत का कुंवा' ठरलेल्या विहिरीतून सुटका केली.
आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील दादासाहेब खेडकर यांच्या शेतातील विहीरीत अचानक पडलेल्या श्वान चाळीस दिवस तसाच विना अन्न पाण्याचा होता. त्याला बाहेर काढण्यासाठी कोणी धाडस करत नव्हते. पण हिच घटना कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना समजाताच त्यांनी सागर जाधव व अन्य एका मित्राला सोबत घेऊन थेट सांगवी आष्टी गाठले आणि जिवाची पर्वा न करता विहीरित उतरून त्या श्वानाला जिवदान देत सूखरूप बाहेर काढल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तब्बल चाळीस दिवस अन्न पाण्याविना असलेल्या श्वानाला त्याने दोरीच्या साहाय्याने खाली उतरून त्याला पकडुन दोरीने बांधून वर काढत अखेर निसर्गाच्या सान्निध्यात सोडुन दिले.
आपल्या परिसरात कुठेही पक्षी व प्राणी विहीरीत किंवा इतर खोल ठिकाणी पडले असतील तर त्याला न घाबरता बाहेर काढायला हवं. शक्य नसेल तर आम्हाला संपर्क साधावा असे आवाहन नितीन आळकुटे यांनी केले आहे.