Maratha Reservation: ... अखेर मराठा आंदोलन मागे, हायकोर्टाच्या विनंतीला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:33 PM2018-08-07T18:33:09+5:302018-08-07T21:08:46+5:30
Maratha Reservation: मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे.
बीड - मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे आंदोनल सुरु होते. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. या आंदोलनानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले. तर गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही याबाबतचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देऊ, असे न्या. एम. जी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्ग आयोगाने सांगिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने मागितलेला तीन महिन्यांचा कालावधी जास्त आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेले आंदोलन तीव्र होत असून, त्यात आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. न्यायालयाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. त्यानंतर,
बीड जिल्ह्याच्या परळी येथून सुरु झालेले मराठा आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. 21 दिवसांच्या आंदोलनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची माहिती मराठा आंदोलनातील संयोजकांनी दिली. परळीतील तहसील कार्यालयाजवळ मराठा आंदोलनाला सुरुवात झाली होती. नागपूर अधिवेशनावेळी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. त्यानंतर, राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटले. तर अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आंदोलनात आपला जीव दिला. याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली, त्यावेळी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन आणि आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती उच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर, आज परळीतून सुरु झालेले हे आंदोलन मागे घेत असल्याचे परळीतील मराठा आंदोलनातील संजोयकांनी जाहीर केले.
मराठा आरक्षणाचा 25 वर्षांचा लढा होता, आज या विजयाचे श्रेय परळी, बीडवासियांना आहे. हे आंदोलन शांततेत चालू होते, काही दुसऱ्यांनीच या आंदोलनात घुसून गोंधळ घातला व आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य केली. तसेच सरकारने मराठा आरक्षण जाहीर करण्याचा टाइम बॉण्ड दिला, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित केली, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला भरीव तरतूद करणे यांसह सर्व मागण्या संदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले, असे परळीतील मराठा आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी जाहीर केले.