घाटनांदूरच्या विद्युत केंद्रात अखेर ब्रेकर बसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:49+5:302021-04-28T04:35:49+5:30
घाटनांदूर : येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये ब्रेकर बसविण्यात आल्याने घाटनांदूरसह परिसरातील गावांत वीज पुरवठा सुरळीत होणार ...
घाटनांदूर
: येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये ब्रेकर बसविण्यात आल्याने घाटनांदूरसह परिसरातील गावांत वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल लोकमतने २५ एप्रिलच्या अंकात 'घाटनांदूर येथे ब्रेकर नसल्याने विजेचा लपंडाव' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर दखल घेत ब्रेकर बसविण्यात आले.
३३ के. व्ही. सबस्टेशनमधून तीन फिडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. एक पूस फिडर, दोन हातोला फिडर तर तिसरे घाटनांदूर फिडरद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी वीज पुरवठ्यासाठी एकच पॉवर ट्रान्सफाॅर्मर असल्याने सतत लोड येऊन वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे लोडशेडिंग करण्यात येते. त्यातच तीन महिन्यांपासून ब्रेकर खराब झाल्याने कुठल्याही फिडरवर काम निघाले की, तीनही फिडर बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. दिवसभरात किमान ३० ते ४० वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज उपकरणांची वाट लागत होती. असह्य उकाडा, कोरोनाचा कहर, लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता. वेगवेगळ्या फिडरला (ब्रेकअप) कामानिमित्त बंद करण्यासाठी असणारे ब्रेकर उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती होती. याबाबत लोकमतने २५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची अंबाजोगाई विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांनी तत्काळ दखल घेत २६ एप्रिल रोजी दुपारी स्वतःच्या देखरेखीखाली नवीन खांब व ब्रेकर बसवून वीज पुरवठा सुरळीत केला.
यापुढे विनाकारण वीज पुरवठा खंडित होणार नाही
कंत्राटदाराला ऑर्डर दिली होती. पण काम होत नव्हते. ‘लोकमत’मध्ये बातमी येताच कंत्राटदाराने दंड लागेल, याची धास्ती घेत तत्काळ काम करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मी स्वतः उभा राहून काम पूर्ण करून घेतले. यानंतर विनाकारण वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची ग्वाही देतो. - संजय देशपांडे, उपकार्यकारी अभियंता, अंबाजोगाई विभाग.