अखेर १८ वर्षांनंतर मिळाले 'एडीएचओ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:28+5:302021-06-09T04:41:28+5:30
बीड : मागील १८ वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदावर डॉ. जयवंत मोरे, तर सहाय्यक आरोग्य अधिकारीपदावर डॉ. ...
बीड : मागील १८ वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदावर डॉ. जयवंत मोरे, तर सहाय्यक आरोग्य अधिकारीपदावर डॉ. रौफ शेख हे सोमवारी रूजू झाले आहेत. त्यांनी लगेच बैठकीला हजेरी लावली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी या नवख्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच वर्ग १च्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ग्रामीण आरोग्य विभागात तर जिल्हा आरोग्य अधिकारी वगळता सर्वच पदे रिक्त होती. त्याचा अतिरिक्त पदभार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला होता. ही परंपरा तब्बल १८ वर्षांपासून होती. अखेर आठवड्यापूर्वी बीड आरोग्य विभागाला अतिरिक्त आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. जयवंत मोरे, तर सहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. रौफ शेख हे मिळाले. त्यांनी सोमवारी लगेच पदभार स्वीकारला. तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इतर आयोजित बैठकांनाही या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. याचवेळी त्यांचे आरोग्य विभागाकडून डॉ. पवार यांनी स्वागत केले. यावेळी बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, पाटोद्याचे डॉ. एल. आर. तांदळे, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष गुंजकर, डॉ. पी. के. पिंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कांबळे रूजू होण्यास अनुत्सूक
या दोन अधिकाऱ्यांसोबतच माता व बालसंगोपन अधिकारी म्हणून डॉ. स्वाती कांबळे यांचीही पदोन्नती झाली होती. परंतु, त्या बीडमध्ये येण्यास अनुत्सूक असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही तीनवेळा पदोन्नती नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. रूजूच व्हायचे नव्हते तर पदोन्नती घेऊन दुसऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर अन्याय का केला? असा सवाल उपस्थित होत आहे. कांबळे यांना रूजू होण्यास सांगावे अन्यथा याठिकाणी दुसरे नियमित अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
===Photopath===
070621\07_2_bed_11_07062021_14.jpeg
===Caption===
डॉ.जयवंत मोरे व डॉ.रौफ शेख यांचे बीड आरोग्य विभागात स्वागत करताना डीएचओ डॉ.आर.बी.पवार. सोबत डॉ.नरेश कासट, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.संतोष गुंजकर आदी.