...अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनीच लावल्या तलाठी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 06:30 PM2021-11-30T18:30:00+5:302021-11-30T18:30:20+5:30
किरायाच्या इमारतीमुळे महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नसल्याचे स्प्ष्टीकरण संबंधित तलाठ्याने दिले आहे.
- नितीन कांबळे
कडा (बीड ) : महापुरुषांच्याऐवजी स्वतःचा फोटो कार्यालयात लावलेल्या तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला आहे. मात्र, त्यांना शासकीय कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा विसर संबंधित तलाठ्यांना पडला होता. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने महापुरुषांच्या प्रतिमा आज तलाठी कार्यालयात लावल्या आहेत.
शासकीय असो कि निम शासकीय कार्यालय असो प्रत्येक ठिकाणी महापुरुषांचे फोटो कार्यालयात असणे बंधनकारक आहे, असे असताना तलाठी अरुण मोरे यांनी एकाही महापुरुषाचा फोटो कार्यालयात लावला नाही. उलट महापुरुषांऐवजी मोरे यांनी चक्क स्वतःचाच सैनिकी गणवेशातीला फोटो कार्यालयात लावल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने समोर आणला होता. चार दिवसानंतर तलाठी मोरे यांनी स्वतःचा फोटो कार्यालयातून काढला. परंतु, त्यांना कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा विसर पडला.
आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयाला भेट दिली असता एकाही भिंतीवर महापुरुषांच्या प्रतिमा आढळून आल्या नाहीत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, समाजसेवक विजय डुकरे, दिपक जाधव, मंगेश खिलारे, विजय साखरे यांनी स्वखर्चाने महापुरुषांच्या प्रतिमा तलाठी कार्यालयात लावल्या. तसेच कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या या मुजोर तलाठ्यावर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी केली आहे.
किरायाच्या इमारतीमुळे लावल्या नाहीत प्रतिमा
तालुक्यातील टाकळसिंग सज्जाचे कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आहे. येथे अरुण मोरे हे तलाठी कार्यरत आहेत. या सज्जा अंतर्गत हिंगणी, पिंपळ सुट्टी, वाकी, टाकळसिंग अश्या गावाचा समावेश आहे. दरम्यान, कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा का लावण्यात येत नाहीत याबाबत तलाठी अरूण मोरे यांना विचारले असता त्यांनी, कार्यालयाची इमारत भाडोत्री असल्याने महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नाहीत, असे स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा :
- अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर
- महापुरुषांऐवजी कार्यालयात लावला चक्क स्वतःचाच फोटो; बीड जिल्ह्यात तलाठ्याचा प्रताप