अखेर न्याय मिळाला, ललिताचा 'ललीत' झालेल्यास पुरूष म्हणून रूजू करून घ्या; पोलीस महासंचालकांनी दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 08:03 PM2018-06-04T20:03:55+5:302018-06-04T20:03:55+5:30
बीड जिल्हा पोलीस दलातील माजलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना अखेर न्याय मिळाला आहे.
बीड : बीड जिल्हा पोलीस दलातील माजलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना अखेर न्याय मिळाला आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना पुरूष प्रवर्गात सामाविष्ट घेण्याचे निर्देश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिले आहेत. सोमवारी हे निर्देश त्यांना प्राप्त झाल्याचे समजते.
ललिता साळवे या सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. साळवे यांनी शरिरात होणा-या पुरुषी बदलांमुळे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे शस्त्रक्रियेच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. दरम्यान, अशा प्रकाराचा पोलीस दलातील हा पहिलाच प्रसंग असल्याने सर्वच विचारात पडले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरुन नऊ महिन्यांनंतर ललीता यांना लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली.
अखेर ललिताच्या संघर्षाला यश, पोलीस महासंचालकांनी दिली लिंगपरिवर्तनाची परवानगी
मागील आठवड्यात मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रीया होऊन ललीता यांचा ललीत झाला. मात्र, पोलीस भरती अधिनियमाप्रमाणे शारिरिक पात्रतांमध्ये ललीता यांची उंची पुरुष प्रवगार्तील उमदेवारांसाठी असलेल्या निर्धारित उंचीपेक्षा कमी भरत होती. त्यामुळे ललीता यांचा ललीत होऊनही पुरुष प्रवर्गात समावेश होणार का ? याकडे लक्ष लागले होते. अखेर महासंचालक सतिश माथूर यांनी विशेष बाब म्हणून ललीता यांना शस्त्रक्रियेनंतर पुरुष प्रवर्गात सामविष्ट करण्याचे निर्देश बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिले आहेत.