अखेर मनोज जरांगे यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:53 PM2024-01-08T12:53:22+5:302024-01-08T12:54:30+5:30

शिरुर कासार तालुक्यातील मातोरी गावात ७१ नोंदी

Finally Kunabi records were found in Manoj Jarange's village | अखेर मनोज जरांगे यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी

अखेर मनोज जरांगे यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी

शिरूर कासार (जि. बीड) : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने सर्वच स्तरांतून कुणबीच्या नोंदी शोधण्याची मोहीम सुरू आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचीच नोंद सापडत नसल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. अखेर रविवारी जरांगे यांच्या जन्मगावी कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांची नोंद सापडल्यामुळे सकल मराठा समाजात आनंदाला उधाण आले आहे.

शिरुर कासार येथे रविवारी भूमी अभिलेख कार्यालयात मोडी तज्ज्ञ संतोष यादव यांनी कुणबीच्या नोंदी शोधून काढल्या. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे अल्पेश पाटील, मराठा समन्वयक डॉ. उद्धव घोडके, मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे आदी उपस्थित होते. १८८०च्या ब्रिटीश सरकार काळातील अतिजीर्ण झालेल्या दस्ताऐवज नोंदीत या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ५४ गावांमधील कुणबीची तपासणी करण्यात आली आहे. त्यात १५१ नोंदी आढळून आल्या आहेत. तालुक्यातील बावी, फडके, बोरगाव च. हाजीपूर, फुलसांगवी, तिंतरवणी, तरडगव्हण भोसले, घाटशिळपारगाव व जाटनांदूर या गावात कुणबी नोंदी मिळून आल्या, तर रविवारी मातोरी गावची दस्ताऐवज तपासणी केली असता ७१ नोंदी मिळून आल्या आहेत. ज्यात मनोज जरांगे यांचाही समावेश आहे. दरम्यान, शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस फेर तपासणीसाठी देणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

कुणबी नोंदीत वाढ होणार
आजपर्यंत मोडी तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे नोंदी शोधणे अवघड झाले होते. आता तज्ज्ञ उपलब्ध झाल्यामुळे नोंदी सापडत असून, कुणबी नोंदीत आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.

हजार नोंदीचे प्रस्ताव
शिरुर कासार तालुक्यातून तहसील कार्यालयात अन्य दस्ताऐवजानुसार १ हजार नोंदीचे प्रस्ताव आले आहेत. अद्याप कुणालाही तहसील कार्यालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.

Web Title: Finally Kunabi records were found in Manoj Jarange's village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.