अखेर जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीला मिळाला मुहुर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 06:03 PM2017-07-18T18:03:14+5:302017-07-18T18:03:14+5:30
माजलगाव तालुक्यासह जिल्ह्यात आढळून आलेल्या कुपोषित बालकांच्या प्रकरणामुळे जिल्हा आरोग्य समन्वय समितीची स्थापनेपासुन एकही बैठक न झाल्याची गंभीर बाब समोर आली होती.
Next
ऑनलाईन लोकमत
बीड/माजलगांव: माजलगाव तालुक्यासह जिल्ह्यात आढळून आलेल्या कुपोषित बालकांच्या प्रकरणामुळे जिल्हा आरोग्य समन्वय समितीची स्थापनेपासुन एकही बैठक न झाल्याची गंभीर बाब समोर आली होती. याबाबत लोकमतने रविवारी (दि.१६ ) वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि. २०) समन्वय समितीची बैठक बोलावली आहे.
माजलगांव तालुक्यातील केसापुरी जवळ पालामध्ये राहणा-या शाळाबाहय मुलांची माहिती घेत असतांना या ठिकाणी तिन बालके ही कुपोषित असल्याचे समोर आले होते. आरोग्य यंत्रणा व त्याच्या अधिपत्याखाली काम करणारी एकात्मिक बालविकास यंत्रणा यांचे अपयश यातून पुढे आले होते. यातच दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जिल्हा आरोग्य समन्वय समितीची एकदाही बैठक झाली नसल्याचे समोर आले. समितीच्या अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वेळे अभावी बैठक होवू शकली नसल्याची माहिती समोर आली होती. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते, या वृत्ताची दखल घेत पालकमंत्र्यानी गुरुवारी (दि.२०) जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकी बाबत सर्व सदस्यांना आरोग्य विभागाकडुन उपस्थित राहण्याचे कळवण्यात आले आहे.