अखेर उचलबांगडी; राठोड यांच्याकडे केवळ स्थलांतरित रुग्णालयाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:43+5:302021-06-16T04:44:43+5:30
बीड : कोरोनातील वाढत्या तक्रारींसह कामचुकारांना पाठीशी घालणारे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची सोमवारी उचलबांगडी करण्यात आली ...
बीड : कोरोनातील वाढत्या तक्रारींसह कामचुकारांना पाठीशी घालणारे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची सोमवारी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोविड रुग्णालयाचा कारभार काढत केवळ स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील नॉनकोविड रुग्णालय पाहण्याचे आदेश काढले आहेत. याच रुग्णालयात पूर्णवेळ राहून रुग्णसेवा आणि समस्यांचे निरसन करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य सेवा आजारी पडली होती. याबाबत तक्रारीही वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेत डॉ. सूर्यकांत गित्ते यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून काढले होते. माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी कारभार हातात घेताच यंत्रणा कामाला लावली आहे, असे असले तरी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्याबद्दलच्या तक्रारी कमी झालेल्या नव्हत्या. हाच धागा पकडून डॉ. राठोड यांना आता केवळ स्थलांतरित रुग्णालयाचे प्रमुख केले आहे. येथे पूर्णवेळ थांबून डॉक्टरांची ड्युटी, रुग्णांच्या समस्या आणि इतर सर्व अडचणी सोडविण्याच्या सूचना सीएस डॉ. साबळे यांनी दिल्या आहेत. नॉनकोविड रुग्णालयातील एकही तक्रार येता कामा नये, अशा सूचना करत रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सांगितले आहे. तक्रार आल्यास मला नाइलाजास्तव कारवाई करावी लागेल, असेही डॉ. साबळे म्हणाले.
शस्त्रक्रिया करण्याला सुरुवात
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञ असतानाही केवळ कोरोनाचे कारण सांगत शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे रुग्णांचे हाल होत हाेते. सोमवारी सकाळी डॉ. साबळे यांनी शस्त्रक्रिया सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शस्त्रक्रिया करण्यासाठी एक रुग्णही दाखल झाला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रोज अहवाल सादर करण्याच्या सूचनाही डॉ. साबळे यांनी दिल्या.
--
नॉनकोविड रुग्णालयातील तक्रारी वाढल्या होत्या. यासाठी डॉ. सुखदेव राठोड यांची पूर्णवेळ येथे नियुक्ती केली आहे. येथील तक्रार आली तर त्यांनाच जबाबदार धरून कारवाई केली जाईल. रुग्णसेवेत हलगर्जी झालेली आणि कामचुकारांना पाठीशी घातलेले बिलकुल खपवून घेतले जाणार नाही.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड