अखेर धुळे -सोलापूर महामार्गावरील भगदाड बुजविले, नियमित पाहणी होणार का?
By अनिल भंडारी | Published: July 8, 2023 02:25 PM2023-07-08T14:25:24+5:302023-07-08T14:31:42+5:30
सुलभ आणि सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने महामार्गाची नियमित पाहणी संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे.
बीड : धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ मार्गावर मांजरसुंभा मांजरसुंभा येथील बीडकडे जाणा-या उड्डाणपूलाच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडलेले होते. यासंदर्भात ३ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांच्याकडे तक्रार केली होती.
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या भल्या मोठ्या भगदाडाबाबत नागरिकांसह प्रसारमाध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडबडून जाग आल्यानंतर नंतर या समस्येची दखल घेत हे भगदाड तातडीने बुजविण्यात आले आहे. यामुळे संभाव्य अपघात टळले असून याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उत्तर- दक्षिण जोडणारा महत्वाचा मार्गसुलभ आणि सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने महामार्गाची नियमित पाहणी संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे. उत्तर दक्षिण जोडणारा धुळे- सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यात जड वाहतुकीचे प्रमाणही जास्त असल्याने रस्ते कुठे खचले आहेत का?, खड्डे पडले आहेत का? याची नियमित पाहणी करावी अशी सूचना नागरिकांतून पुढे आली आहे.