बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखा करतेय काय? २६ गुन्हे, २३३ कोटींचा अपहार; तपासही झाला; पण ग्राहकांच्या हाती रुपयाही नाही
By सोमनाथ खताळ | Published: January 6, 2024 11:45 AM2024-01-06T11:45:22+5:302024-01-06T11:46:58+5:30
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास : रक्कम परत करण्यात पोलिस अपयशी; मेहनतीचे पैसे ग्राहकांना कधी मिळणार?
सोमनाथ खताळ, बीड : सामान्यांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून मल्टिस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या. नंतर याच ठेवींचा वापर इतर ‘उद्योग’ उभारण्यासाठी केला. नंतर हेच पैसे संबंधित ठेवीदारांना परत करता न आल्याने अध्यक्षांसह संचालक मंडळाने धूम ठोकली. सध्या बीड जिल्ह्यात अशा मल्टिस्टेटवाल्यांचे पेव फुटले आहे. मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता विविध पाच मल्टिस्टेटने जवळपास २३३ कोटी रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी २६ गुन्हे दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेने तपासही पूर्ण केला; परंतु अद्यापही ठेवीदारांच्या हाती रुपयाही मिळालेला नाही. गुन्हा दाखल झाला तरी ग्राहकांना पैसे परत करण्यासह आर्थिक गुन्हे शाखा अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मल्टिस्टेटचे जाळे वाढत आहे. अशाच प्रकारे राज्यभरात जाळे तयार केलेल्या ‘शुभकल्याण’, ‘परिवर्तन’, ‘जिजाऊ’, ‘मातोश्री’, ‘श्रीमंतयोगी’ या मल्टिस्टेटने सामान्य लोकांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. लोकांनीही मेहनतीचे पैसे जमा करून या मल्टिस्टेटमध्ये ठेवले; परंतु या मल्टिस्टेटच्या अध्यक्ष, संचालक मंडळाने या पैशांतून स्वत:चे ‘उद्योग’ उभारले. त्यामुळे लोकांचे पैसे वेळेवर हे लोक परत करू शकले नाहीत. याचा बाेभाटा झाल्यानंतर ठेवीदारांनी पोलिस ठाणे गाठत संबंधित मल्टिस्टेटचे अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक आदींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात आतापर्यंत २६ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या शाखेने गुन्ह्यांचा तपास कागदोपत्री पूर्णही केला. मालमत्ता जप्तही केल्या; परंतु त्यानंतरची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास गती मिळाली नाही. महसूलकडूनही या या शाखेला फारसे सहकार्य मिळाले नाही. या शाखेने अद्यापही एकाही ग्राहकाला एकही रुपया परत केलेला नाही, हे वास्तव आहे. मग ही शाखा करतेय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
‘ज्ञानराधा’, ‘साईराम’ विरोधातही रोष वाढला
बीडमधील सुरेश कुटे यांची ‘ज्ञानराधा’ व साईनाथ परभणे यांची ‘साईराम मल्टिस्टेट’ही सामान्यांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरत आहे. मागील काही महिन्यांपासून या शाखा ग्राहकांना केवळ तारखेवर तारखा देत आहेत. कुटे व परभणे यांच्याकडून थेट ग्राहकांना तोंड देण्याऐवजी केवळ साेशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. इकडे मात्र मेहनतीचे पैसे वेळेत आणि अडचणीच्या काळातही मिळत नसल्याने ठेवीदार संताप व्यक्त करीत आहेत.
आमच्याकडे विविध मल्टिस्टेटच्या संबंधित २६ गुन्हे दाखल आहेत. यातील जवळपास गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात गेले आहे. मालमत्ताही जप्त केल्या; परंतु त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण होण्यास अडथळे येत आहेत. आमच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे. हरिभाऊ खाडे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड
कोणत्या मल्टिस्टेटने केला घोटाळा शुभकल्याण मल्टिस्टेट
एकूण गुन्हे १० अपहार रक्कम - १०० कोटी
जप्तीचा प्रस्ताव - ४५ कोटी
राज्यातील ठेवीदार - १७४७ ---
परिवर्तन मल्टिस्टेट
एकूण गुन्हे ११ अपहार रक्कम - १० कोटी ८० लाख ६९ हजार २८३ तपासात निष्पन्न रक्कम - १९ कोटी ६९ लाख ९५ हजार २०१ जप्त मालमत्ता - ७ कोटी १७ लाख ५३ हजार ९५५ रुपये
ठेवीदार निष्पन्न - ८१२
जिजाऊ मल्टिस्टेट
एकूण गुन्हे ३
अपहार रक्कम - ११० कोटी
जप्त सोने - ३९ लाख रुपये
इतर मालमत्ता - ३५ कोटी
मातोश्री मल्टिस्टेट
एकूण गुन्हे १
अपहार रक्कम - २ कोटी ३८ लाख
जप्त मालमत्ता - नाही
श्रीमंतयोगी मल्टिस्टेट, गेवराई
एकूण गुन्हे १
अपहार रक्कम - २ कोटी
जप्त मालमत्ता - नाही
एकूण गुन्हे २६ एकूण अपहार रक्कम २३३ कोटी