‘स्वाराती’मधील भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार; कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:44+5:302021-09-14T04:39:44+5:30
बीड : अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयात कोरोनाकाळात झालेली भरती ही राजकीय दबावातून झाली तसेच यात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार ...
बीड : अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयात कोरोनाकाळात झालेली भरती ही राजकीय दबावातून झाली तसेच यात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार आमदार नमिता मुंदडा यांनी केली होती. यात समितीने चौकशी करून अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे. आता यात प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाईची टांगती तलवार आहे. जिल्ह्यात कोरोनाकाळात नियमित व कंत्राटी कर्मचारी अपुरे पडत असल्याने तीन महिन्यांच्या कंत्राट पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, शिपाई आदी पदांची भरती करण्यात आली होती. परंतु, ‘स्वाराती’मध्ये झालेली पदभरती ही राजकीय दबावातून होती. येथील विभागप्रमुखांनी आर्थिक व्यवहार करत गुणवत्ताधारकांना डावलून इतरांचीच नियुक्ती केली. हा सर्व प्रकार समजताच आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकाराची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मनिषा मिसकर यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले. या समितीने चौकशी करून अहवाल मिसकर यांच्याकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. आता या विषयीच्या निकालाची प्रतीक्षा असून, दोषींवर कारवाईची टांगती तलवार आहे. या भरती प्रक्रियेतील डॉक्टरांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नसल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.
---
आम्ही भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागवली. यात बहुतांश जणांना आवक विभागात नोंद करताच भरती केले होते. केवळ राजकीय दबावातून आणि आर्थिक व्यवहार करत ही भरती झाली होती. त्यामुळेच मी तक्रार केली.
आमदार नमिता मुंदडा
--
मी आत्ताच पदभार स्वीकारला आहे. माझ्या काळात चौकशी झाल्याची माहिती नाही. मला माहिती घ्यावी लागेल.
डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, स्वाराती, अंबाजोगाई
--
‘स्वाराती’मधील भरती प्रक्रियेची चौकशी पूर्ण झाली आहे. याचा अहवालही तयार करून दिला आहे.
- शरद झाडके, अध्यक्ष, चौकशी समिती