तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:00+5:302021-08-24T04:38:00+5:30

बीड : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई- चालानद्वारे केलेल्या दंडाची वाहनचालकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वाहनांवरील दंड वेळेत न ...

A fine of thousands on your vehicle, isn't it? | तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना ?

तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना ?

googlenewsNext

बीड : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई- चालानद्वारे केलेल्या दंडाची वाहनचालकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वाहनांवरील दंड वेळेत न भरल्यास कोर्ट-कचेऱ्यांमध्ये खेटे घालावे लागू शकतात. शिवाय वाहन चालविण्याचा परवाना देखील रद्द होऊ शकतो.

वेगमर्यादेचे उल्लंघन, विनाहेल्मेट दुचाकीस्वार, शीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, नो-पार्किंग नियमाचे उल्लंघन आदी कारणांस्तव वाहनचालकांना पाचशे रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पूर्वी वाहतूक, महामार्ग पोलीस वाहनांची धरपकड करून दंड वसूल करत. आता ई- चालानद्वारे दंड करण्यात येत आहे. प्रत्येक वाहतूक पोलिसांना डिव्हाइस दिले आहे. त्यात ऑनलाइन ई- चालानसह पावती देऊन दंड वसूल करण्याची सोय आहे. दरम्यान, अनेकदा कळत नकळत सिग्नल तुटतो तर कधीकधी वेगमर्यादेचेही उल्लंघन होते. अनेक वाहनचालक दुसऱ्यांदा पोलिसांनी वाहन पकडल्याशिवाय दंड भरत नाहीत. दंड भरण्यासाठी स्वत:हून पुढे येणाऱ्यांची संख्या अल्प असल्याचे वाहतूक शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

...

ई- चालानद्वारे झालेला दंड

२०१९ - ११५५७१००

९९१५०००

...

२०२० - १७२७५०००

८२२१३००

..

२०२१ - २०७४२९००

१२६३२२००

....

दंडाची थकबाकी वाढली

जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर झालेल्या दंडाचा मेसेज वाहनचालकांना जातो. मात्र, दंड भरण्यास वाहनचालक अनुत्सुक असतात. अनेकदा पोलीस दुसऱ्यांदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किंवा तपासणीसाठी वाहन पकडतात तेव्हा मात्र नाइलाजाचे दंड भरावा लागतो. तीन वर्षांतील थकीत दंडाची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. चालू वर्षी ८१ हजार २२८ वाहनांना दोन कोटी ७४ लाख दोन हजार ९०० रुपये दंड करण्यात आला. यापैकी एक कोटी २६ लाख ३२ हजार २०० रुपये वसूल केले आहेत.

....

कसे फाडले जाते ई-चालान

१)महामार्गावर बीड व गढी येथील केंद्रांकडे स्वतंत्र इंटरसेप्टर वाहने आहेत. ती महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची गती मोजतात. अत्युच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांद्वारे एक किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या वाहनांची गती नोंदवली जाते. याद्वारे वेगमर्यादेचे उल्लंघन झाले असेल तर ऑनलाइन ई-चालानद्वारे दंड केला जातो.

२) याशिवाय वाहतूक पोलिसांकडील डिव्हाइसद्वारेही ऑफलाइन तसेच ऑनलाइन दंडात्मक कारवाया केल्या जातात. यात नियमांचे उल्लंघन करणारी वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाया करण्यात येतात. एखादा वाहनचालक पोलिसांना हुलकावणी देऊन पळाला तरी त्याच्या पासिंग क्रमांकावरून त्या वाहनाला दंड करण्यात येतो.

...

मोबाइल अपडेट केला आहे का?

वाहनांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद होताना मोबाइल क्रमांकही घेतला जातो. ई-चालान व मेसेज संबंधित क्रमांकावर जाते, तर काही वेळा दंड भरण्याचे टाळण्यासाठी वाहनचालक चुकीचा मोबाइल क्रमांक सांगतात. मात्र, यामुळे आपल्या वाहनावर किती दंड आहे, तो भरला किंवा नाही, हे माहिती होत नाही. त्यामुळे मोबाइल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

...

ई- चालानद्वारे दंड आकारल्यानंतर वाहनचालांना मेसेज जातो. दंड भरून सहकार्य करणे ही वाहनचालकांची जबाबदारी आहे. दंड थकीत असेल तर संबंधित वाहनमालकावर न्यायालयात खटला दाखल करता येतो. वाहनांचा परवाना तसेच वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कायद्यात तरतूद आहे. खरेदी - विक्री व्यवहारानंतर हस्तांतरण प्रक्रियेतही यामुळे अडचणी येऊ शकतात.

- कैलास भारती, सहायक निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बीड

...

...

Web Title: A fine of thousands on your vehicle, isn't it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.