गरुडाला आकाश मोकळे करून पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 03:25 PM2020-02-15T15:25:19+5:302020-02-15T15:29:53+5:30
सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला.
- अनिल भंडारी
बीड : जखमी गरुडाची सुश्रूषा पूर्ण झाल्यानंतर त्याला पालवन येथील सह्याद्री देवराई परिसरात सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आणि पहिल्या वृक्षसंमेलनाचे सूप वाजले.
गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस भरलेल्या या वृक्षसंमेलनात शेकडो पर्यावरणप्रेमी, विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगनहळीकर, झाडांची पहिली बॅँक चालविणारे पोपट रसाळ, संजय नरुटे, सुनंदा पवार आदींनी संमेलनात मार्गदर्शन केले.
पाच झाडे लावणार का?
सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचा सहभाग
पालवन परिसरात झालेल्या वृक्ष संमेलनास बीड जिल्हा व परिसरातील विद्यार्थ्यांनी सहली काढून भेटी दिल्या. काही विद्यार्थी तर १४ कि.मी. अंतर पायी चालत आले होते. या वृक्षसंमेलनात विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या सहभागाचे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही कौतुक केले.
कुतुहल जागविणारे प्रश्न
तासभर चाललेल्या वृक्षसुंदरी स्पर्धेत निसर्गाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे प्रश्न कुतुहल जागविणारे ठरले. या स्पर्धेसाठीच्या पॅनलमध्ये सयाजी शिंदे, अरविंद जगताप, श्रीकांत इंगनहळीकर, शिवानंद टाकसाळे, रविंद्र बनसोड, कल्पना जगताप, अलका शिंदे, मेघना बडजाते आदींचा समावेश होता.