राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल; पोलीस निरीक्षकावरचा 'हल्लाबोल' आला अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:28 PM2018-01-19T15:28:38+5:302018-01-19T15:29:27+5:30
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बीड : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भाजप, शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा राज्यभर सुरू आहे. १७ जानेवारी रोजी ही यात्रा बीड जिल्ह्यात होती. बुधवारी दुपारी पाटोदा येथे सभा झाल्यानंतर रात्री बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात सभेचे आयोजन केले होते. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक, माजी मंत्री तथा आ.राजेश टोपे, चित्रा वाघ, संदीप क्षीरसागर, रेखा फड यांची उपस्थिती होती.
याच सभेत रेखा फड यांचेही भाषण झाले. बोलत असताना त्यांनी गुन्ह्यांचा तपास लावत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत. तसेच केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे विकाऊ असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. भर सभेत पोलीस अधिकार्यांबद्दल असे अपशब्द वापरल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चौकशी करून शुक्रवारी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सरकारविरोधात भांडत असताना रेखा फड यांनी पोलिसांबद्दल अपशब्द उच्चारून नवा वाद निर्माण केला आहे. सध्या पोलीस दलात त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करीत आहेत.
आरोपीविरोधात कठोर कारवाई करू
तपास अधिकारी मा.न्यायालयाला पत्र लिहून प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात परवानगी मागतील. न्यायालयाचे आदेश मिळताच आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून रेखा फड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या फिर्यादीत पोलीस अधीक्षक यांना धमक्या दिल्याचाही उल्लेख आहे, हे सुद्धा खरे आहे. आमचा तपास सुरू आहे. लवकरच तो पूर्ण करू.
- सय्यद सुलेमान, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड