‘फायर है मै’ चे फॅड; बीडमध्ये अवैध शस्त्र विक्री करणारे रॅकेट सक्रीय, ५० हजार ते दीडलाख रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:16 PM2022-04-05T13:16:48+5:302022-04-05T13:17:05+5:30
पोलिसांपुढे अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान कायम आहे.
- संजय तिपाले
बीड : पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही फायर है मै... हा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा डायलॉग भलताच प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या बाजारातही फायर है मै...चीच हवा आहे. ५० हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत अवैधरीत्या पिस्तूल सहज उपलब्ध करून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. बेकायदा शस्त्र विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. अवैध शस्त्रांच्या तस्करीचा मुद्दा देखील यामुळे चर्चेत आहे. राजकीय वादाला गोळीबारासारख्या घटनांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे पोलिसांपुढे अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान कायम आहे. दरम्यान, बेकायदा शस्त्रांविरोधात पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने सध्या या बाजारात तेजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्रांच्या बाजाराचा कानोसा घेतला असता जिल्ह्यात उत्तरप्रदेश, बिहार व मध्यप्रदेश येथून चोरीछुपे पिस्तूल येत असल्याचे सांगितले जाते; मात्र त्यासाठी मुळापर्यंत जाऊन तपास करावा लागणार आहे.
जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्र शोध मोहिमेबाबत नियोजन केले आहे. लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.
-सुनील लांजेवार, प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड.
जिल्हा कचेरीच्या दारात अन् हळदीच्या कार्यक्रमातही
१) बीडमध्ये २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरसेवकाने गोळीबार केला होता. याला राजकीय वळण मिळाले व परस्परविरोधी गुन्हे नोंद झाले. हे प्रकरण राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही गाजले.
२) अंबाजोगाईत २६ मार्च रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी डीजेच्या तालावर मित्रांच्या खांद्यावर बसून नाचणाऱ्या नवरदेवाने हवेत फायर केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी बालाजी भास्कर चाटे या नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा नोंद केला.
परवाना पित्याच्या नावे, हवा करतोय पोरगा
परवाना असलेल्यांनीच पिस्तूलचा वापर करणे आवश्यक आहे; मात्र पित्याच्या नावाने परवाना असलेल्या शस्त्राचा वापर नियमबाह्यपणे मुलगा करत असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. अशा पद्धतीने परवाना नसताना शस्त्र बाळगणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
अवैध शस्त्रांवरील दोन वर्षांतील कारवाया....
वर्ष -गुन्हे -आरोपी -जप्त मुद्देमाल
२०२० -९ -१२ -९ गावठी कट्टे
२०२१ -१० -१३ -१२ गावठी कट्टे